Jammu Kashmir Terrorist Attack: जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) पूंछ जिल्ह्यात (Poonch District) गुरुवारी (21 डिसेंबर) सशस्त्र दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात चार जवान शहीद झाले आणि तीन गंभीर जखमी झाले. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली.


जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. दहशतवादी हल्ल्यात देशाचे चार जवान शहीद झाले आहेत, तर तीन जवान जखमी झाले आहेत. 20 डिसेंबरपासून सुरक्षा दलांनी या भागात दहशतवाद्यांविरोधात घेराव आणि शोध मोहीम सुरू केली होती. त्याचवेळी, गुरुवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास दहशतवाद्यांनी पाळत ठेवून हा हल्ला केला. ज्यावेळी हा हल्ला करण्यात आला त्यावेळी लष्कराच्या दोन गाड्यांमधून सैनिक प्रवास करत होते. महिनाभरात याच भागात दहशतवाद्यांनी लष्करावर केलेला हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी 22 नोव्हेंबरला राजौरी येथे झालेल्या चकमकीत 5 जवान शहीद झाले होते.


जम्मूमधील संरक्षण पीआरओ लेफ्टनंट कर्नल सुनील बारटवाल यांनी सांगितलं की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची ठोस माहिती मिळाल्यानंतर 20 डिसेंबरच्या रात्री पूंछ जिल्ह्यातील थानामंडी-सुरनकोट भागातील ढेरा की गली भागात संयुक्त शोध मोहीम सुरू करण्यात आली. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. अतिरिक्त सुरक्षा दल घटनास्थळाकडे जात असताना दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रक आणि जिप्सीवर गोळीबार केला.


या हल्ल्याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिलं असलं तरी या हल्ल्यात देशाचे 4 जवान शहीद झाल्याचं संरक्षण प्रवक्त्यांनी सांगितलं. कारवाई सुरू असून पुढील माहिती काढली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. घटनास्थळावरून समोर आलेल्या फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये लष्कराच्या दोन वाहनांच्या तुटलेल्या काचा दिसत आहेत. 


गेल्याच महिन्यात पाच जवान शहीद 


जवळच्या राजौरी जिल्ह्यातील बाजीमल वनक्षेत्रातील धरमसाल पट्ट्यात मोठ्या गोळीबारानंतर काही आठवड्यांनी हा हल्ला झाला. गेल्या महिन्यात दोन कॅप्टनसह पाच लष्करी जवान शहीद झाले होते. नोव्हेंबरमध्ये, दोन दिवसांच्या चकमकीत लष्करानं दहशतवादी कारवायांचा मास्टरमाईंड क्वारी आणि त्याचा एक सहकारी मारला गेला होता. 10 नागरिक आणि पाच लष्करी जवानांच्या हत्येसह अनेक हल्ल्यांचा क्वॅरी मास्टरमाईंड होता. 


राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांच्या सीमेवरील ढेरा की गली आणि बुफलियाज दरम्यानचा परिसर घनदाट जंगलाचा आहे आणि तो चमरेर जंगल आणि नंतर भाटा धुरियन जंगलाकडे जातो, जिथे यावर्षी 20 एप्रिल रोजी लष्कराच्या वाहनावर हल्ला झाला होता. पाच जवान शहीद झालं होतं. मे महिन्यात दहशतवाद्यांविरोधातील कारवाईदरम्यान चामेरेर जंगलात लष्कराचे आणखी पाच जवान शहीद झाले होते आणि एक वरिष्ठ अधिकारी जखमी झाला होता. या कारवाईत एक विदेशी दहशतवादीही मारला गेला.