Jammu Kashmir :  जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात गुरुवारी (21 डिसेंबर) सशस्त्र दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात चार जवानांनी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले. तर, दोन-तीन जण जखमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 


वृत्तसंस्था पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरनकोट पोलीस ठाण्यांतर्गत 'धेरा की गली' आणि बुफलियाज दरम्यानच्या एका वळणावर दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास सैनिकांना शोध मोहिमेच्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या वाहनावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने घेतली आहे. 


हल्ला कुठे झाला?


एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, राजौरी सेक्टरमधील थानामंडी भागात हा हल्ला झाला. दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-राजौरी-पुंछ महामार्गावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय लष्कराच्या जवानांनीही लगेच दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. बुधवारी (20 डिसेंबर) सायंकाळपासून या भागात  असलेल्या दहशतवाद्यांविरोधातील संयुक्त मोहिमेला हे सैनिक मदत करणार होते. 






पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने घेतली जबाबदारी


पीटीआयच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (एलईटी) ची शाखा असलेल्या पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (पीएएफएफ) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.


संरक्षण प्रवक्त्याने या हल्ल्याची माहिती दिली


जम्मू स्थित संरक्षण पीआरओ लेफ्टनंट कर्नल सुनील बर्तवाल यांनी सांगितले की, दहशतवादी असल्याची ठोस गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर बुधवारी रात्री पूंछ जिल्ह्यातील थानामंडी-सुरनकोट भागातील ढेरा की गली या भागात संयुक्त शोध मोहीम सुरू करण्यात आली. सुरक्षा दल घटनास्थळाकडे जात असताना दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनांवर गोळीबार केला.  


सध्या सुरू असलेल्या कारवाईत चार जवान शहीद झाले असून तीन जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारवाई सुरू आहे. 


दहशतवाद्यांनी जवानांची शस्त्रे पळवल्याची भीती


सैनिक दहशतवाद्यांशी हातमिळवणी करत असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी नाकारली नाही. अधिका-यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी लक्ष्य केलेल्या जवानांची शस्त्रे पळवून नेली असण्याची शक्यता आहे.