Jammu Kashmir Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये रविवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या जवानाने आपल्या प्राणाचे सर्वोच्च बलिदान दिले आहे. स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफचे जवान एका चेकपोस्टजवळ तपासणी करत होते. त्याच दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला. ही घटना गोंगू क्रॉसिंगजवळील भागात झाली असल्याचे म्हटले जात आहे. 


दहशतवादी हल्ल्यानंतर  सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला असून दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील गोंगू क्रॉसिंगजवळ रविवारी दुपारच्या सुमारास पोलीस आणि सीआरपीएफकडून संयुक्तपणे वाहनांची तपासणी सुरू होती. या दरम्यान, दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे एएसआय यांनी प्राणांचे बलिदान दिले. 


जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी क्रॉसिंगजवळ एका सफरचंदाच्या बागेतून गोळीबार सुरू केला. या दरम्यान, सीरआरपीएफचे एएसआय विनोद कुमार गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. हल्लेखोर दहशतवाद्यांना जेरबंद करण्यासाठी परिसरात नाकेबंदी करण्यात आली असून शोध मोहीम सुरू आहे. 


जम्मू-काश्मीरच्या दहशतवादी संघटनांकडून गेल्या चार वर्षांत 700 तरुणांची भरती


दहशतवादी संघटनांनी गेल्या चार वर्षांत जम्मू आणि काश्मीरमध्ये 700 तरुणांची भरती केली आहे. सध्या 141 सक्रिय दहशतवादी आहेत, त्यापैकी बहुतेक विदेशी आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांची भरती सुरू आहे. सध्या सीमेपलीकडे असलेल्या दहशतवादी तळांवरून दहशतवादी भरती सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. हे दहशतवादी प्रामुख्याने जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन याशिवाय लष्कर-ए-तैयबा, त्याची संलग्न संघटना द रेझिस्टन्स फ्रंट यासारख्या संघटनांतील आहेत.


इतर महत्त्वाची बातमी:


Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सैन्याला मोठं यश, दोन दहशतवाद्यांचं आत्मसमर्पण