मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात होता होता वाचला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाहनाचा ताफा राजभवन येथून वर्षा निवास्थानी (Varsha Bunglow) जात असताना एका अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्र्यांचे सुरकक्षाकवच भेदले आणि आपली कार मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसवली. मलबार हिलवरील रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. याची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ताफ्यातील वाहनचालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
मुख्यमंत्र्यांचा ताफा जेव्हा जातो तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा पोलीसांचा बंदोबंस्त असतो. तसेच ताफा जात असताना सहजासहजी कोणी गाडी आडवी घालत नाही पण या मलबार हिलच्या रस्त्यावरून मुख्यमंत्र्यांचा ताफा राजभवनकडे जात असताना या अज्ञात व्यक्तीने ताफा येत असल्याचं पाहिलं गाडी थांबवली पण अचानक काय झालं माहिती नाही या इसमानं गाडी बंगल्याच्या बाहेर घेत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा आडवं जात विरुद्ध दिशेने पुढे निघून गेला. त्यामुळे मुख्यमंत्र्याचा ताफा काही क्षणासाठी थांबला. नेते आणि मंत्र्यांचा ताफ्याचा वेग हा जास्त असतो. त्यामुळे असा ताफा ज्या परिसरातून जातो त्या परिसरात पोलिसांकडून सर्व खबरदारी घेतली जाते. या प्रकरणामुळे मुख्यमंत्री कार्यालयानं संताप व्यक्त केला आहे. तसेच पोलीसांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.
पाहा व्हिडीओ-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राजभवनावर गेले होते. तिथून परतत असताना धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. पण मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामधील गाड्यांचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात अनोळखी गाडी शिरल्यानं आश्चर्य व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे पोलिसांकडूनही कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही. सर्वसामान्यांना एक न्याय आणि धनाड्यांना एक न्याय पोलिसांकडून देण्यात येतो का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.