Kashmir Journalist Arrested : काश्मीरमध्ये एका पत्रकाराला पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावर देशविरोधी आणि काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी कारवायांना योग्य ठरवण्याचा प्रयत्न या पत्रकाराने सोशल मीडियावर केल्याचा आरोप आहे. त्याशिवाय सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून सुरक्षा यंत्रणांची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप या पत्रकारावर ठेवण्यात आला आहे.
शुक्रवारी जम्मू-काश्मीर पोलिसांनी ही कारवाई केली. फदाद शाह असे या पत्रकाराचे नाव असून 'द काश्मीरवाला' ऑनलाइन मासिक संकेतस्थळाचा संपादक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुलवामा जिल्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही फेसबुक युजर्स आणि न्यूजपोर्टल लोकांमध्ये भीती निर्माण करण्याच्या गुन्हेगारी हेतूने देशविरोधी मजकूर, छायाचित्रे, व्हिडिओ आणि पोस्ट प्रसारीत करत आहे. सोशल मीडियावरील अशा प्रकारच्या पोस्टमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असेही पोलिसांनी म्हटले.
एफआयआर क्रमांक 19/2022 नुसार या प्रकरणाच्या तपासादरम्यान शाहला अटक करण्यात आली. सध्या त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. शाह याला एक फेब्रुवारी रोजी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा त्याला जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असल्याचे सांगितले.
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटरवर या कारवाईचा विरोध केला. सत्याच्या बाजूने उभे राहणे हे देशविरोधी मानले जाते. अत्यंत असहिष्णु आणि हुकूमशाही सरकारला आरसा दाखवणे हेही देशविरोधी कृत्य ठरत असल्याचे मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले. आणखी किती फहादला अटक करणार असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
डिजिटल मासिक असणाऱ्या 'द काश्मीरवाला'मध्ये जम्मू-काश्मीरमधील बातम्यांसह, सामाजिक-सांस्कृतिक घडामोडींवरील वृत्त आणि भाष्य केले जाते.
मागील महिन्यातच 'द काश्मीरवाला'मधील प्रशिक्षणार्थी पत्रकार सज्जाद गुल यालाही लोकांना सरकारविरोधात चिथावणी देणे आणि वैमनस्य पसरवणे या उद्देश्याने ट्वीट केल्याबद्दल अटक करण्यात आली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Omicron Origin : खरंच उंदरातून माणसांमध्ये आला ओमायक्रॉन?, अभ्यासातील दावा
- भारताला मोठं यश! 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी अबू बकरला अटक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha