Jammu-Kashmir News: जम्मू-काश्मीरमधील गांदरबल भागात आज सकाळी भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. या कारवाईदरम्यान काही वेळापूर्वीच प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्करचा एक दहशतवादी मारला गेला होता. सध्या पोलिसांकडून परिसरात शोधमोहीम सुरु आहे. दरम्यान, गुरुवारी, 10 मार्चला दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. नैना बाटपोरा भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला होता.


दरम्यान, कालच पुलवामामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा एक दहशतवादी मारला गेला आहे. पुलवामामध्ये सुरु असलेल्या चकमक पाहता प्रशासनाने खबरदारी म्हणून पुलवामा आणि शोपियानमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद केली होती. याशिवाय श्रीनगर-बनिहाल रेल्वे सेवाही बंद करण्यात आली होती. चकमक संपल्यानंतर आता ती पुन्हा पूर्ववत करण्यात येणार आहे. दोन्ही दहशतवाद्यांच्या मृतदेहांशिवाय, चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला होता. 


गुरुवारी चार दहशतवाद्यांना केली होती अटक 


दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला आणि पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या (एलईटी) चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली होती.  सुरक्षा दलांने सोपोरच्या रफियाबादच्या नदिहाल भागाला वेढा घालून शोध मोहीम सुरु केली होती. या मोहिमेदरम्यान, लष्कर-ए-तैयबा या प्रतिबंधित संघटनेच्या एका दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. 


ग्रेनेड हल्लाही झाला होता


श्रीनगरच्या मध्यभागी असलेल्या व्यस्त अमीरा कादल पुलावर रविवारी झालेल्या ग्रेनेड हल्ल्या झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी मंगळवारी दोघांना अटक केली आहे. या हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून 36 जण जखमी झाले असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली.


महत्त्वाच्या बातम्या: