Jammu Kashmir Earthquake : जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) आणि लडाखमध्ये (Ladakh) भूकंप झाला आहे. गेल्या 24 तासांत जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पाच वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केलवर इतकी होती. जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी, 17 जून रोजी दुपारी 2:30 वाजता पहिला भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टर स्केल होती. लेहमध्ये भूकंपाचा दुसरा हादरा जाणवला. हा भूकंप शनिवारी रात्री 9.44 वाजता झाला असून त्याची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल होती. तिसरा भूकंपाचा धक्का जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे भारत-चीन सीमेजवळ रात्री 9.55 वाजता झाला, या भूकंपाची तीव्रता 4.4 रिश्टर स्केल इतकी होती.
जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये भूकंपाचे धक्के
जम्मू-काश्मीरमधील रामबन आणि डोडा जिल्ह्यात शनिवारी सौम्य तीव्रतेचे दोन भूकंप झाले. यासोबतच लेह-लडाखमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, चिनाब खोऱ्यात आठ तासांत 3.. रिश्टर स्केल आणि 4.4 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचवेळी लडाखमध्ये 4.5 तीव्रतेचा भूकंप जाणवला. त्याआधी 13 जून रोजी डोडा आणि किश्तवाडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते, या भूकंपाची तीव्रता 5.4 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली होती. या भूकंपामुळे येथील घरांनाही भेगा पडल्या आहेत.
राष्ट्रीय विज्ञान केंद्राने दिली माहिती
गेल्या 24 तासांत पाच वेळा भूकंपाचा हादरा
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी म्हणजे राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 2.13 वाजता ईशान्य लेहमध्ये चौथा भूकंपाचा हादरा बसला. या भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल होती. मात्र, भूकंपामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. यानंतर रविवारी पहाटे 3.50 वाजता जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे पाचवा भूकंपाचा धक्का बसला, याची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल इतकी होती.