जम्मू : पाकिस्तानचा प्रत्येक नापाक मनसुबा उधळून लावण्यासाठी आणि दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी ज्याप्रमाणं भारतीय संरक्षण यंत्रणा सज्ज आहेत, त्याचप्रमाणे आता थेट जम्मू काश्मीरच्या लेकीसुद्धा दहशतवादाशी लढा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जम्मूमध्ये सीआरपीएफच्या वतीनं विद्यार्थीनींना सेना आणि निमलष्करी दलांमध्ये सामील होण्यासाठीच्या उद्देशानं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
कित्येक वर्षांपासून जम्मू काश्मीरमध्ये देभक्तीची भावना अनेकांच्याच मनात घर करुन आहे. आता हीच भावना आणखी बळावली असून येथील विद्यार्थिनी थेट सैनिकी गणवेश चढवत देशसेवेसाठी पुढे सरसावल्या आहेत. या विद्यार्थिनींचा उत्साह पाहता त्या दहशतवाद्यांशीही दोन हात करण्यास सज्ज असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे एका संधीची.
जम्मू येथे असणाऱ्या महिला महाविद्यालयात सीआरपीएफनं आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरक्षा दलांमध्ये महिलांच्या सहभागाला प्राधान्य देण्यात येत आहे. ज्यामध्ये या विद्यार्थीनींना सैनिकी जीवनशैलीचेही धडे देण्यात येत आहेत.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मार्च 2021 | शनिवार
देशाच्या सीमा भागात होणार अशाच उपक्रमांचं आयोजन
सीआरपीएफच्या मते, जम्मू- काश्मीर येथील विद्यार्थिनीममध्ये खंबीर प्रवृत्तीची कमतरता नाही. त्यांना फक्त योग्य त्या माध्यमातून प्रोत्साहन दिलं जाण्याची आवश्यकता आहे. परिणामी या कार्यक्रमाचं आयोजन हे फक्त शहरी भागांपुरताच मर्यादित न ठेवता ग्रामीण आणि देशाच्या सीमा भागांतही याचं आयोजन केलं जाणार असल्याची माहिती सीआरपीएफकडून मिळत आहे. देशसेवेची ओढ मनात बाळगणाऱ्या प्रत्येक मुलीला देशाच्या संरक्षणार्थ योगदान देण्याची संधी मिळावी हा यामागचा मुख्य हेतू आहे.