जम्मू काश्मीर पोलिसांचा एक जवान काश्मिरी पोलिसांसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे. विशेष म्हणजे जवानाने स्टम्पच्या जागी आपल्या ढालचा वापर केला आहे. मुलगा बॅटिंग करत आहे, तर जवान विकेट कीपरच्या भूमिकेत आहे. दोघांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून ते चिंतामुक्त होऊन या खेळाचा अतिशय आनंद लुटत आहेत.
काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही हा फोटो ट्वीट केला आहे. काश्मीरमधील फोटो पत्रकार बासित जरगार यांनी हा फोटो काढल्याचं अब्दुल्ला यांनी सांगितलं.
बारामुला पोलिसांच्या ट्वीटवर एका व्यक्तीने मुलासोबत खेळणाऱ्या जवानाचं नाव वसीम असल्याचं सांगितलं. त्याने लिहिलं आहे की, "मिस्टर वसीम एक शूर पोलिस अधिकारी आहेत."
फोटो जर्नलिस्ट बासित जरगार यांनी आपल्या ट्वीटमध्ये फोटोच्या ठिकाणाचाही उल्लेख केला आहे. बासित जरगार यांच्या माहितीनुसार, पोलिस अधिकारी मुलासोबत श्रीनगरच्या जामिया मशिदीबाहेर क्रिकेट खेळत आहेत. 'गाव कादल नरसंहार'चे 28 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीनगरच्या अनेक भागात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती, तेव्हाचा हा फोटो आहे.
'गाव कादल नरसंहार' 21 जानेवारी 1990 रोजी झाला होता. यामध्ये सुमारे 50 जणांचा मृत्यू झाला होता. सुरक्षा यंत्रणानी रात्रीच्या वेळी शोधमोहीम राबवली होती. यादरम्यान सुरक्षरक्षकांच्या छळाचा नागरिकांनी विरोध केला होता, त्यामुळे त्यांच्यावर गोळीबार झाला होता. यंदा खोऱ्यात या नरसंहारच्या 28 वर्षपूर्तीच्या वेळी कोणतंही आंदोलन होऊ नये यासाठी कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती.
दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्यात तणाव वाढला होता. इथे सुमारे दोन महिने कर्फ्यूसारखी स्थिती होती. यादरम्यान सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेकही झाली होती. काश्मीरच्या प्रश्नावर राजकारणही तापलं होतं.
अशा परिस्थितीत मुलासोबत क्रिकेट खेळणाऱ्या पोलिसाचा फोटो दिलासा देत आहे. सोशल मीडियावर या फोटोचं जोरदार स्वागत होत आहे. एका यूझरने लिहिलं आहे की, "क्रिकेट बॉल फेका, दगड नाही."
पोलिसांनी हा फोटो 'श्रीनगर, नौहट्टा आणि सुंदर फोटो' या हॅशटॅगने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन शेअर केला आहे. या फोटोसारखी परिस्थिती निर्माण करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा दिवसरात्र काश्मीर खोऱ्यात मेहनत करत आहेत.