Jammu And Kashmir : काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी  प्रथमच जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जात आहेत. परंतु, त्यांच्या दौऱ्यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दहशतवाद्यांनी आज श्रीनगरमध्ये दोन स्थानिक मजुरांना गोळ्या घालून जखमी केले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून परिसराची नाकाबंदी करून हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.  


गोळीबार झालेले दोन्ही मजूर बंगालचे रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या हल्यानंतर एका कामगाराची प्रकृती गंभीर आहे. जम्मू पोलिसांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. श्रीनगरच्या नौगाम भागात दहशतवाद्यांनी दोन मजुरांना गोळ्या घालून जखमी केले आहे. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे ट्विट जम्मू पोलिसांनी केले आहे. 


या हल्ल्यासह काश्मीरमध्ये आज आणखी दोन हल्ले झाले आहेत. पहिला हल्ला जम्मू जिल्ह्यातील सुंजवान भागात झाला. या चकमकीत सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला तर 4 जवान जखमी झाले. सुंजवानमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यावेळी सीआयएसएफचे 15 जवान त्यांना मदत करण्यासाठी बसमधून जात होते.


दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर ग्रेनेडने हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला. तर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर देत दोन्ही दहशतवाद्यांना ठार केले. संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. 


"पोलीस आणि सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिली आहे. 


24 एप्रिल रोजी पंतप्रधान काश्मीर दौऱ्यावर 
जम्मू-काश्मीरमधील सांबा येथे पंचायती राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात  24 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. परंतु, त्यांच्या दौऱ्याआधिच दहशदी हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याने अधिकाऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. 


महत्वाच्या बातम्या