सोपोर : जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सीआरपीएफच्या एका पथकावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. याशिवाय तीन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी परिसराचा वेढा दिला आहे.


सीआरपीएफच्या 179 बटालियनवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी पेट्रोलिंग पथकावर हल्ला केला. पेट्रोलिंग करणाऱ्या जवानांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यानंतर जवानांनीही प्रत्युत्तर दिलं. दोन ते तीन दहशतवादी परिसरात लपल्याची शक्यता आहे. या परिसरातील सुरक्षा वाढवली असून शोध मोहीम सुरु आहे.


जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितलं की, "सोपोरच्या मॉडल टाऊनमध्ये दशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर हल्ला केला. काही जवान आणि सामान्य नागरिक हल्ल्यात जखमी झाले आहे. परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे.





पेट्रोलिंग करणाऱ्या पथकावर हल्ला
आज सकाळी सीआरपीएफचं एक पथक पेट्रोलिंग करत होतं. रेबन परिसरात सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी तीन जवान आणि एका नागरिकाला गोळी लागली. मृत नागरिकाचं वय 60 वर्षे होतं. सध्या जवानांची अतिरिक्त फौज घटनास्थळी पोहोचली असून संपूर्ण परिसरातील सुरक्षा वाढवली आहे.


याआधी दक्षिण कश्मीरच्या बिजबेहरामध्येही सीआरपीएफ जवानांवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात कुलगामच्या यारीपोरामधील एका पाच वर्षांच्या चिमुकल्याचाही मृत्यू झाला होता.