Jammu and Kashmir Assembly Polls : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज (16 मार्च) जाहीर केला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी तारखा जाहीर केल्या. मात्र, चार विधानसभा आणि पोटनिवडणुकीसाठी सुद्धा कार्यक्रम जाहीर केला असताना जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर करण्यात आलेली नाही. लोकसभा निवडणुकीसह सिक्कीम, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये एकावेळी विधानसभा निवडणूक होणार आहे. काश्मीरमध्ये निवडणूक होत नसल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून जनता संतप्त असून आंदोलने करत आहे. कलम 370 रद्द करून काश्मीर मोकळा श्वास घेत असल्यास निवडणूक का नाही? अशीही विचारणा केली जात आहे. 


यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर लगेच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोग कटिबद्ध आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, भारतीय लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. आमचे वचन आहे की आम्ही अशा प्रकारे राष्ट्रीय निवडणुका घेऊ की भारत जागतिक स्तरावर चमकेल. देशाला खऱ्या अर्थाने उत्सवपूर्ण, लोकशाही वातावरण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.


'काश्मीरमध्ये अधिक सुरक्षेची गरज'


जम्मू-काश्मीरमध्ये संसदीय आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी न घेण्याबाबत स्पष्टीकरण देताना राजीव कुमार म्हणाले की, अलीकडेच निवडणूक आयोगाच्या पथकाने तेथे भेट दिली तेव्हा जम्मू-काश्मीर प्रशासनाने त्यांना सांगितले की, निवडणुका घेण्यासाठी तेथे अधिक सुरक्षा असेल."प्रशासनाने आम्हाला सांगितले की प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुमारे 10 ते 12 उमेदवार असतील, म्हणजे सुमारे 1,000 उमेदवार रिंगणात असतील. प्रत्येक उमेदवाराला योग्य सुरक्षा कवच द्यावे लागेल आणि त्यासाठी अतिरिक्त फौजफाट्यांची आवश्यकता असेल." असे त्यांनी सांगितले.  


जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभेसाठी मतदान


निवडणूक आयोगाने सांगितले की, लोकसभेचा कार्यकाळ 16 जून रोजी संपत आहे. अशा स्थितीत त्याआधी नवी लोकसभा स्थापन करावी लागेल. त्याच वेळी, आंध्र प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि ओडिशामधील विधानसभांचा कार्यकाळही या वर्षी जूनमध्ये वेगवेगळ्या तारखांना संपत आहे आणि जम्मू-काश्मीरमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. येथे लोकसभेच्या पाच जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे.


लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार 


लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होणार आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी होणार आहे. 20 मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी होणार असून सातव्या टप्प्याचे मतदान 1 जून रोजी होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.


2019 मध्ये भाजप, पीडीपी, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने येथे स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. नॅशनल कॉन्फरन्सने काश्मीरमध्ये तीन तर भाजपने जम्मूमध्ये दोन जागा जिंकल्या होत्या. यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स एकत्र निवडणूक लढवू शकतात. पीडीपीही निवडणुकीत ताकद दाखवण्यासाठी सज्ज आहे.


इतर महत्वाच्या बातम्या