चेन्नई: जलीकट्टू बंदीविरोधात आज संपूर्ण तामिळनाडू एकवटलं आहे. जलीकट्टू या पारंपारिक खेळाला परवानगी मिळावी, यासाठी सर्वसामान्य नागरिकांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी आवाज उठवला आहे.

त्यासाठी आज तामिळनाडू बंदची हाक देण्यात आली आहे. चेन्नईच्या मरिना बीचवर हजारोंच्या संख्येने नागरिक जमले असून, त्यांनी जलिकट्टूला परवानगी देण्याची मागणी केली आहे.

तामिळनाडूतील प्रसिद्ध 'जलीकट्टू' या पारंपारिक खेळावर सुप्रीम कोर्टाने 2014 मध्ये बंदी घातली आहे. पण मोदी सरकारने अध्यादेश काढून या खेळाला परवानगी दिली होती. मात्र कोर्टाने पुन्हा आपली बंदी कायम ठेवत सरकारला झटका दिला.

मात्र तामिळनाडूचे मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, पुन्हा ही बंदी हटवण्याची मागणी केली आहे.

इतकंच नाही तर अभिनेता कमल हसनपासून, संगीतकार ए आर रहमान, विख्यात बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद, आर अश्विन, श्री श्री रवीशंकर यांनी जलिकट्टूचं समर्थन केलं आहे.

ए आर रहमान तर एक दिवशीय उपोषण करणार आहे.

काय आहे जलीकट्टू?

जलीकट्टू हा तामिळनाडूतील सुमारे 400 वर्षांपूर्वीचा पारंपारिक खेळ आहे. पीकं कापणीच्यावेळी हा खेळ खेळला जातो. यामध्ये 300-400 किलोच्या बैल/सांड यांच्या शिंगांना नोटा बांधल्या जातात. त्यानंतर बैलाला भुजवून चिडवलं जातं आणि गर्दीत सोडून देतात.

या खेळात भाग घेणाऱ्यांनी त्या बैलांची शिंगं पकडून त्याला शांत करायचं असतं.

प्राणीप्रेमींचा आरोप

बैलांना चिडवण्यासाठी त्यांना मद्य पाजून, मारहाण करुन उसकावलं जातं असा आरोप प्राणीमित्र संघटनांचा आहे. अशा पिसाळलेल्या बैलाला काही अंतरावरच रोखण्याचा हा खेळ आहे. फक्त स्पेनमधल्या बुल फाईटप्रमाणे इथे बैलाला जीवे मारलं जात नाही. बैलगाडी शर्यतींमध्येही अशा पद्धतीने बैलांना मारहाण होत असल्याचा आरोप आहे.

संबंधित बातम्या


जलीकट्टूला विरोध असेल तर बिर्याणीवरही बंदी घाला: कमल हसन