Omicron Variant Cases in India : महाराष्ट्रानंतर जयपूरमध्येही कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा स्फोट उडालाय. महाराष्ट्रात रविवारी सात रुग्णाची भर पडली होती.  जयपूरमध्येही एकाच कुटुंबातील 9 जणांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. यामधील चार जण दक्षिण आफ्रिकेतून परतले होते. त्यांच्या संपर्कातील अन्य पाच जणांना संसर्ग झालाय. सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आढळली आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. देशातील ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या 21 वर पोहचली आहे.


दक्षिण अफ्रीकामधून राज्यस्थानमध्ये आलेल्या कुटुंबाच्या जनुकीय अनुक्रम (जीनोम सिक्वेन्सिंग) तपासात नऊ जणांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचं समोर आलं. आरोग्य सचिव वैभव गालरिया म्हणाले की, दक्षिण आफ्रिकातून आलेल्या कुटुंबाला आणि त्यांच्या संपर्कातील ओमायक्रॉन रुग्णांना उपचारासाठी आरयूएचएसमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या रुग्णांमध्ये सध्या सौम्य लक्षणं जाणवत आहेत.  


34 जण संपर्कात –
आरोग्य सचिव वैभव गालरिया म्हणाले की, दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या कुटुंबासह संपर्कात आलेल्या 34 जणांचे नमुणे घेण्यात आले होते. यामध्ये नऊ जणांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचं समोर आलं आहे. 25 जण निगेटिव्ह आले आहेत. या कुटुंबाच्या संपर्तात अजीतगढ़मधील एक कुटुंबही संपर्कात आलं होतं. या आठही जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. 


देशात ओमायक्रॉन व्हेरियंटचे 21 रुग्ण -
दिल्ली, गुजरातमध्ये प्रत्येकी एक रुग्ण तर कर्नाटकमध्ये दोन आणि महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरियंटचे आठ रुग्ण आढळले आहेत. त्यातच आता राज्यस्थानमधील 9 रुग्णाची भर पडली आहे. देशातील ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या 21 झाली आहे.


महाराष्ट्रात ओमायक्रॉन रुग्णाची संख्या 8 –
शनिवारी डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा एक रुग्ण आढळला होता. यामध्ये आता पुण्यातील 7 रुग्णाची भर पडली आहे. रविवारी पिंपरी चिंचवडमधील 6 तर पुण्यात एका रुग्णाची भर पडली आहे. पिंपरी चिंचवडमधील एकाच कुटुंबातील सहा जणांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. नायजेरियातून भावाला भेटण्यासाठी आलेल्या 44 वर्षीय महिलेला, तिच्यासोबत आलेल्य दोन मुलींना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्याशिवाय त्या महिलेचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुलींनाही ओमायक्रॉनची लागण झाली आहे. सर्वांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून पिंपरी-चिंचवडमधील जिजामाता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या सहा रुग्णापैकी तीन जण 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.