ITA Awards: एबीपी न्यूजने रविवारी मुंबईत आयोजित 22 व्या आयटीए अवॉर्ड्समध्ये सलग दुसऱ्या वर्षी 'सर्वात लोकप्रिय हिंदी न्यूज चॅनल'चा पुरस्कार पटकावला आहे. याशिवाय एबीपी न्यूज अँकर रुबिका लियाकत यांना आयटीए अवॉर्ड्समध्ये ‘बेस्ट टॉक आणि चॅट शो’ कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाला आहे. 'घंटी बजाओ'ने सर्वोत्कृष्ट शो - न्यूज आणि  चालू घडामोडी कॅटेगरीत पुरस्कार जिंकला आहे.


सर्वात लोकप्रिय हिंदी न्यूज चॅनलचा पुरस्कार जिंकल्यानंतर  एबीपी नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पांडे (Avinash Pandey) म्हणाले की, या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी शशी रंजन, अनु रंजन आणि आयटीएचा आभारी आहे. ज्यांनी अहोरात्र मेहनत करून दर्जेदार बातम्या दिल्या, ब्रेकिंग न्यूजच्या काळात ज्यांनी पत्रकारितेच्या मुल्यांशी प्रामाणिक राहून काम केलं आणि लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला अशा शेकडो पत्रकारांसाठी हा पुरस्कार असल्याचं मी मानतो.


ते पुढे म्हणाले की, “एबीपी नेटवर्कचा यावर विश्वास आहे आणि म्हणूनच आम्ही आमच्या दर्शकांपर्यंत दर्जेदार बातम्या पोहोचवण्याच्या व्यवसायात आहोत. पण या सगळ्यात माझ्यासाठी एबीपी न्यूजच्या वतीने, एबीपी न्यूजला सर्वात लोकप्रिय हिंदी न्यूज चॅनल म्हणून मतदान करून आमच्यावर विश्वास दाखवणाऱ्या लाखो प्रेक्षकांचे मनापासून आभार व्यक्त करण्याचा हा आणखी एक प्रसंग आहे. आमच्या दर्शकांनी यातून आम्हाला पुन्हा एकदा संदेश दिला आहे की, एबीपी न्यूजचे त्यांच्या हृदयात एक विशेष स्थान आहे आणि यामुळेच हा पुरस्कार आमच्यासाठी इतका खास आहे.” 


रुबिका लियाकत यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुलाखतीसाठी हा सन्मान मिळाला. तसेच एबीपी अँकर अखिलेश आनंद यांना त्यांच्या शो 'घंटी बजाओ'मधील 'वॉटर वेस्ट मॅनेजमेंट' वरील एपिसोडसाठी बेस्ट शो - न्यूज/करंट अफेअर्स' हा पुरस्कार मिळाला. एबीपी न्यूज हे एकमेव न्यूज चॅनल आहे, ज्याने 22 व्या आयटीए अवॉर्ड्समध्ये विविध आणि स्वतंत्र कॅटेगरीत सर्वाधिक पुरस्कार जिंकले आहेत.

दरम्यान, या वर्षीच्या जुलै महिन्यात एबीपी नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पांडे (Avinash Pandey)  यांना 'मीडिया पर्सन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अविनाश पांडे यांना इंटरनॅशनल अॅडव्हर्टायझिंग असोसिएशनने (International Advertising Association- IAA) हा सन्मान दिला होता. तसेच या वर्षी अविनाश पांडे यांना ENBA कडून 'बेस्ट सीईओ' पुरस्कारही मिळाला आहे. तर एबीपी माझाच्या मास्टर स्ट्रोक (Master Stroke Show)  शोला 'बेस्ट न्यूज करंट अफेयर्स'चा पुरस्कार मिळाला.