सुरत (गुजरात) : नोटाबंदीनंतर काळा पैसा बाहेर यायला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणच्या छापेमारीत आयकर विभागाने कोट्यवधींची रोकड जप्त केली आहे. त्यातच गुजरात राज्यातील सुरतमधील एका चहावाल्याकडे घबाड सापडलं आहे.
किशोर भजियावाला या चहावाल्याकडे तब्बल 650 कोटींची संपत्ती सापडली. यामध्ये 1 कोटी 45 लाख रुपये रोकड असून, यात 1 कोटी 5 लाखांच्या नव्या नोटा आहेत. याशिवाय, 9 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, भजियावालकडे जवळपास 650 कोटी रुपयांची संपत्ती आहे. धक्कादायक म्हणजे आतापर्यंत भजियावालाचे मोजकेच लॉकर उघडण्यात आले आहेत. आणखी काही लॉकर उघडण्याच बाकी आहेत. किशोर भजियावालाकडे आयकर विभागाने छापा मारल्यानंतर 400 कोटी रुपये जप्त केले. यामध्ये रोकड, दागिने, प्रॉपर्टीचे कागदपत्र इत्यादींचा समावेश आहे.
किशोर भजियावालाकडे 650 कोटी रुपयांच्या संपत्तीसोबतच शेअर मार्केट, प्रॉपर्टीमधील गुंतवणूकही आहे. कोट्यवधींची गुंतवणूकही भजियावालाच्या नावावर आहे.
सुरतमधील पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेत आयकर विभाग भजियावालाच्या घबाडाच्या तपासासाठी पोहोचले, त्यानंतर एकामागोमाग एक असे 16 लॉकर सापडले. यामध्ये नोटांचे बंडल, सोन्याची बिस्किटं आणि दागिनेही होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, भजियावालाच्या 16 लॉकरमध्ये 90 लाखांहून अधिक किंमतीचं 3 किलो सोनं, 180 किलो चांदी आणि जवळपास 1 किलो डायमंड ज्वेलरी जप्त करण्यात आलं. चार दिवसांआधीच किशोरचा मुलगा जिग्नेश भजियावाला हा नव्या नोटा बँकेच्या लॉकरमध्ये लपवण्यासाठी गेलो होता. बँकेवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची नजर होती. जिग्नेश तिथे आल्यानंतर बँकेतच छापा मारण्यात आला.
किशोर भजियावाला 31 वर्षांपूर्वी सुरतमध्ये चहा विकायचा. मात्र, सध्या तो 650 कोटींची संपत्तीचा मालक आहे. तरीही आतापर्यंत भजियावालाच्या एकूण संपत्तीची माहिती मिळालेली नाही. गेल्या चार दिवसात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी भजियावालाच्या अनेक संपत्ती सील केल्या आहेत.
चहावाला ते फायनान्सर असा प्रवास करणाऱ्या भजियावालाने व्याजाने पैसे देऊन, त्यामधून कोट्यवधींची संपत्ती गोळा केली. किशोर भजियावालाच्या अटकेनंतर आणि त्याच्या संपत्तीच्या जप्तीनंतर त्याने फसवलेल्या लोकांनी आनंद व्यक्त केला आहे.