नवी दिल्ली: इस्रोचे (ISRO) प्रमुख एस. सोमनाथ ( S. Somanath) यांच्या भारतीय वेदामधून विज्ञानाचा शोध लागल्याचा दावा करण्याऱ्या वक्तव्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. 'ब्रेकथ्रू सायन्स सोसायटी' (BSS) या संस्थेने एस सोमनाथ यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. सोमनाथ यांना असंच वाटत असेल तर इस्त्रोने रॉकेट बनवण्यासाठी कोणत्या वेदातून ज्ञान घेतलं याचा खुलासा करावं असं आव्हानही त्यांनी दिलं आहे. 


महर्षि पाणिनी संस्कृत आणि वैदिक विद्यापीठात (Maharshi Panini Sanskrit and Vedic University) आयोजित दीक्षांत समारंभात 24 मे रोजी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ म्हणाले होते की, धातुशास्त्र, ज्योतिष, खगोलशास्त्र, वैमानिक विज्ञान आणि भौतिकशास्त्रातील गोष्टी प्राचीन भारतातून घेतल्या गेल्या आहेत. विज्ञानाचा उगम वेदांतून झाला आहे. अरब लोकांनी हे ज्ञान भारतातून घेतले आणि नंतर ते युरोपमध्ये पोहोचलं. मग युरोपमधील लोकांनी त्याला मॉडर्न सायन्स म्हणून समोर आणलं. 


Breakthrough Science Society : ब्रेकथ्रू सायन्स सोसायटीचे निवेदन 


इस्त्रो प्रमुखांच्या या दाव्याचा बीएसएस सोसायटीने निषेध केला आहे. बीएसएस सोसायटीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, इस्रो प्रमुखांनी गोष्टी सांगताना थोडी अतिशयोक्ती केली आहे. इस. पू्र्व 600BC ते इस. 900  या काळात भारतात विज्ञानाच्या क्षेत्रात नक्कीच घडामोडी घडल्या. मेसोपोटेमिया, ग्रीस, इजिप्तमध्ये या काळात किंवा त्याही आधीच्या काळात विकासाशी संबंधित घटना घडल्या हेही खरे आहे. यानंतर अरब लोकांना यात आघाडी मिळाली आणि त्यांनी ही माहिती युरोपात आणली. 


प्रबोधनाच्या काळात युरोपमध्ये निरीक्षण आणि गृहितकांच्या आधारे तसेच प्रायोगिक पडताळणीच्या आधारे आधुनिक विज्ञानाचा पाया रचला गेला. गॅलिलिओ यांनी ही सुरुवात केली. आधुनिक विज्ञानातील ही वस्तुनिष्ठ पद्धत भूतकाळातील कोणत्याही गोष्टीच्या तुलनेत भिन्न होती. न्यूटन, फॅराडे, मॅक्सवेल, डार्विन, आइनस्टाईन आणि इतरांच्या महान शास्त्रज्ञांच्या योगदानाने विज्ञानाची वाटचाल या धडाक्यात चालूच राहिली. आधुनिक विज्ञानावर आधारित आजचे ज्ञान कोणत्याही सभ्यतेच्या प्राचीन ज्ञानापेक्षा खूप प्रगत आहे. 


विज्ञानाची चर्चा आणि देवाणघेवाण यामुळे ते अधिक विकसित झाले. प्रत्येक स्तरावर, आम्ही मागील स्तरावरून काहीतरी शिकलो. जे मुद्दे सत्याच्या कसोटीवर उतरू शकले नाहीत ते संशोधनाच्या आधारे सोडले. इस्त्रो प्रमुखांना जर असंच वाटत असेल तर रॉकेट बनवताना त्यांनी वेदातील कोणत्या ज्ञानाचा आधार घेतला हे स्पष्ट करावं. 


विज्ञानाचा उगम भारतीय वेदांमधून झाल्याचा दावा या आधीही अनेकांनी केला होता. त्यामध्ये रामायण आणि महाभारताच्या काळात भारतात प्रगत तंत्रज्ञान असल्याची थेअरी मांडण्यात आली होती.