श्रीहरिकोटा : सूर्याचा अभ्यास करण्यसाठी आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) सज्ज झाली आहे. त्यासाठी आदित्य एल 1 (Aditya L-1 ) हे यान 2 सप्टेंबर रोजी प्रक्षेपित करण्यात येणार आहे. यासंबंधी लोकांमध्ये सध्या बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. हे यान जवळपास 15 लाख किलोमीटरचा प्रवास करणार असून या प्रवासाकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. आदित्य एल 1 हे यान 2 सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून भारतीय वेळेनुसार सकाळी 11.50 मिनिटांनी प्रक्षेपित केलं जाईल. हे यान पोलार सॅटेलाईट (PSLV-C57) द्वारे प्रक्षेपित केले जाणार आहे. 


आदित्य एल1 हेच नाव का?


आदित्य एल 1 या नावावरुनच या मोहिमेचं उद्देश लक्षात येतो. सूर्याला आदित्य देखील म्हटलं जातं, त्यामुळे आदित्य हे नाव ठेवण्यात आलं. तर एल 1 म्हणजे लॅग्रेंज पॉईंट 1. सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये पाच लॅग्रेंज पॉईंट आहेत. यातील पहिल्या पॉईंटवर भारताचं हे यान जाणार आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, एल 1 पॉईंट हा पृथ्वीपासून जवळपास 15 लाख किलोमीटर दूर आहे. आदित्य एल 1 हे सूर्याच्या एल 1 पॉईंटवरुन सूर्याचा अभ्यास करणार आहे. 


लॅग्रेंज पॉईंट म्हणजे काय?


पृथ्वी, सूर्य आणि चंद्रामध्ये पाच लॅग्रेंज पॉईंट आहेत. इटालियन-फ्रेंच गणितज्ञ जोसेफ लुई लॅग्रेंज यांच्या नावावरुन या बिंदूंना हे नाव देण्यात आले आहे. सूर्य आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे अंतराळात या जागेवर पार्किंगची जागा उपलब्ध होते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, या जागेवर सूर्य आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षणाचा समतोल साधला जातो, ज्यामुळे कोणतीही गोष्ट याठिकाणी दीर्घकाळ राहू शकते. म्हणूनच आदित्य-एल1 हे लॅग्रेंज पॉईंट1 वर लाँच केले जाणार आहे. तिथून हे यान सूर्यावर लक्ष ठेवणार असून त्याचा अभ्यास करणार आहे. 


कसा करणार सूर्याचा अभ्यास? 


इस्रोच्या माहितीनुसार, आदित्य-एल1 सूर्याच्या विविध स्तरांचा अभ्यास करणार आहे. त्यासाठी सात पेलोड्स पाठवण्यात येणार आहेत. स्पेसक्राफ्टमध्ये बसवलेले हे पेलोड्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक, पार्टिकल आणि मॅग्नेटिक फील्ड डिटेक्टरच्या मदतीने फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सूर्याच्या सर्वात बाहेरील थराचा अभ्यास करतील. या सात पेलोड्सपैकी चार पेलोड्स हे सूर्याचा अभ्यास करणार आहेत. तर उरलेले तीन एल 1 मधील कणांचा अभ्यास करतील. भारताची ही मोहीम चांद्रयानासारखीच यशस्वी होईल असा विश्वास इस्रोच्या शास्रज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष या मोहिमेकडे लागून राहिलं आहे. 


हेही वाचा : 


Aditya L-1 Mission: तुम्हाला प्रत्यक्ष पाहता येणार इस्रोच्या 'आदित्य L-1' मोहिमेचं प्रक्षेपण! 2 सप्टेंबरला लाँचिंग; 'असं' करा रजिस्ट्रेशन