नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय अचानक जाहीर केला. या निर्णयानंतर नोटा बदलण्यासाठी तसंच जमा करण्यासाठी नागरिकांची धांदल उडाली. काळ्या पैशांवर आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं मोदींनी त्यावेळी सांगितलं.
पंतप्रधान मोदींनी भारतीय अर्थव्यवस्थेत आमुलाग्र बदल करणारा हा निर्णय जाहीर केल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटलं. बहुतेकांनी रात्री बारा वाजेपर्यंत एटीएममधून आपल्याला आवश्यक तेवढ्या रू. 100 च्या नोटा काढून घेण्यासाठी गर्दी केली.
दुसऱ्या दिवसापासून देशभरात चलन तुटवडा निर्माण झाला. दोन दिवसांनंतर काही एटीएम सुरू झाले पण अनेक एटीएम बंद होते, जे चालू होते, त्यात पैसे नव्हते. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्याने चलनापैकी 86 टक्के नोटा एका क्षणात रद्द झाल्या. परिणामी 100, 50, 20, 10, 5 रुपयांच्या नोटा कमी पडू लागल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणतंही नियोजन न करता एवढा मोठा निर्णय घेतल्याची टीका होऊ लागली.
ही गर्दी आताशी थोडी ओसरली असली तरी अजून तुटवडा कमी झाला नाही. त्यामुळे हा निर्णय पंतप्रधानांनी पुरेशी तयारी नसताना घेतला का अशी विचारणाही अनेक राजकीय पक्षांसह निष्णात अर्थतज्ञांनी व्यक्त केली. सरकारने खरंच घाईघाईत हा निर्णय का घेतला असावा, तर त्याचं कारण आहे, हा प्लॅन लीक होण्याची भिती सरकारला होती, कारण अनेक व्हॉट्स अप ग्रुपवर रू. 2000 ची गुलाबी नोट व्हायरल झाली होती.
मोदी सरकारला हा महत्वाकांक्षी प्लॅन लीक होण्याची भिती होती?
मात्र पंतप्रधानांनी या निर्णयापूर्वीच पुरेसं प्लॅनिंग केलं होतं, हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एका नोटिफिकेशनमुळे दिसत आहे. त्यानुुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नोटाबदलीचा निर्णय 18 नोव्हेंबर रोजी जाहीर करायचा होता, मात्र काही कारणांमुळे तो तब्बल दहा दिवस आधीच पुरेशी तयारी झालेली नसताना जाहीर करावा लागला. हा एवढा मोठा निर्णय तब्बल दहा दिवस आधीच जाहीर करण्यामागे महात्वाकांक्षी प्लॅन लीक होण्याचा संशय सरकारला होता का अशी शक्यता व्यक्त केली जात आ आहे.
दोन हजारांच्या नोटा सोशल मीडियावर फिरु लागल्याने पंतप्रधानांनी दहा दिवस आधीच म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला असण्याचीही शक्यता आहे. आरबीआयच्या दोन नोव्हेंबरच्या एका नोटिफिकेशनमुळे या शक्यतेला दुजोरा मिळत आहे.
रिझर्व्ह बँकेचं नोटिफिकेशन
रिझर्व्ह बँकेने 'पायलट' प्रोजेक्टअंतर्गत 2 नोव्हेंबर रोजी देशातील सर्व बँकांना नोटिफिकेशन पाठवलं होतं. त्यामध्ये बँकांनी त्यांच्या 10 टक्के एटीएमध्ये फक्त 100 रुपयांच्या नोटा उपलब्ध करण्याचे आदेश दिले होते. ठराविक एटीएममधून केवळ 100 रुपयांच्याच नोटांचं वाटप करा, असं या नोटिफिकेशनमध्ये म्हटलं होतं. 500 आणि 1000 च्या नोटा बंद झाल्यानंतर चलन तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी ही काळजी घेतली जात होती.
शंभर रुपयांच्या नोटा चलनात जास्त वापरल्या जातात. त्यामुळे बँकेने एटीएममधून जास्तीत जास्त 100 च्या नोटांचं वाटप करावं, असं रिझर्व्ह बँकेने सांगितलं. या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत देशभरातील सर्व बँकांचे 10 टक्के एटीएम कॅलिब्रेट करावेत, ज्यामधून फक्त 100 रुपयांच्या नोटाच येतील, असे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले होते.
सर्वसाधारणपणे एटीएम मशीनमध्ये तीन ट्रे असतात, त्यामध्ये एक शंभरच्या नोटांसाठी, दुसरा आणि तिसरा अनुक्रमे रू. 500 आणि रू. 1000 साठी असतो. देशातील एकूण एटीएमपैकी फक्त 10 टक्के एटीएम फक्त रू. 100 च्या नोटांसाठी राखीव झाले असते तर त्यामध्ये असलेल्या तीनही ट्रेमध्ये रू. 100 च्या नोटा सामावल्या गेल्या असत्या, त्यामुळे ग्राहकांना रू. शंभरच्या नोटांची कमतरता भासली नसती.
असा होता प्लॅन!
रिझर्व्ह बँकेने 2 नोव्हेंबर रोजी सर्व बँकांना नोटिफिकेशन पाठवून त्यांच्या 10 टक्के एटीएमध्ये फक्त 100 रुपयांच्या नोटा उपलब्ध करण्याचे आदेश दिले होते. 2 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या काळात 100 रुपयांच्याच नोटा असणाऱ्या 20,000 एटीएमचं कॅलिब्रेशन करण्यास सांगितलं. दरम्यानच्या काळात म्हणजेच 2 ते 17 नोव्हेंबरपर्यंत नव्या नोटांची पुरेशी छपाई करण्यासाठी वेळ मिळाला असता. इतकंच नाही तर 18 नोव्हेंबरला निर्णय जाहीर केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवार आणि रविवारी (19 आणि 20 नोव्हेंबर) बँका बंद राहिल्या असत्या. शनिवार हा बँकाचा वर्किंग डे असला तरी शनिवारी फारसे व्यवहार होतच नाहीत, त्यामुळे त्यादिवशी बँका बंद राहिल्या असत्या तरी फारसा फरक जाणवला नसता. सोमवारी नागरिकांना अडचण न होता सगळे व्यवहार सुरळीत झाले असते, असा प्लॅन होता.
देशात सध्या सुमारे दोन लाख एटीएम आहेत. याचा अर्थ 17 नोव्हेंबरपर्यंत एटीएमचं कॅलिब्रेशन पूर्ण झाल्यावर त्यापैकी 20,000 एटीएममधून केवळ 100 रुपयांच्या नोटाच आल्या असत्या. त्यामुळे नागरिकांना जुन्या नोटा बदलून 100च्या नोटा मिळवण्यात फारशी अडचण आली नसती.
एटीएममध्ये 100 च्या नोटांसाठी सरकारचा प्रयत्न
प्रत्येक एटीएममध्ये तीन ट्रे अर्थात कार्ट्रेज असतात, त्याला बिन्सही म्हणतात. त्यामध्ये प्रत्येक ट्रेमध्ये 100, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा ठेवल्या जातात. पण 100 रुपयांच्या अधिकाधिक नोटांचं वाटप व्हावं, यासाठी इतर दोन ट्रेमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांऐवजी केवळ 100 रुपयांच्याच नोटाच ठेवल्या असत्या. 100 रुपयांच्या नोटा आधीच चलनात असल्यामुळे याबाबत कोणताही संशय निर्माण झाला नसता.
2 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या काळात 100 रुपयांच्याच नोटा असणाऱ्या 20,000 एटीएमचं कॅलिब्रेशन करण्याचं ठरलं होतं. मात्र पंतप्रधान मोदींनी 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय अचानक जाहीर केला आणि हा प्लॅन बारगळला.