IPS Sadanand Vasant Date NIA DG : नवी दिल्ली : देशात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अशातच देशात लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) तारखा जाहीर झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वीच केंद्र सरकारनं (Central Government) एक मोठं पाऊल उचललं आहे. 1990 महाराष्ट्र केडरचे प्रसिद्ध IPS अधिकारी सदानंद वसंत दाते (IPS Sadanand Vasant Date) यांची केंद्र सरकारनं राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) DG पदावर नियुक्ती केली आहे. केंद्र सरकारच्या वतीनं सदानंद दाते आणि इतर दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या एजन्सीमध्ये नियुक्त्या करण्याचे आदेश जारी केले आहेत.
26/11 च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्यांच्या शौर्य आणि बुद्धिमत्तेबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आलेलं. आता दहशतवाद, नक्षलवाद, अतिरेकी, इंडियन पॉप्युलर फ्रंट यांसारख्या बंदी घातलेल्या संघटना आणि खलिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात देशासोबतच अमेरिका, ब्रिटन, कॅनडात या देशांतून तपास करणाऱ्या एनआयएची धुरा आता सदानंद दाते यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. सदानंद दातेंकडे एएनआयची जबाबदारी सोपवल्यानंतर असं म्हटलं जात आहे की, आता एनआयए अंतर्गत सुरक्षा प्रकरणी अधिक जलद कारवाई करणार आहे. सविस्तर जाणून घेऊयात आयपीएस सदानंद वसंत दाते यांच्याबाबत...
26/11 च्या हल्ल्यात दातेंनी शौर्य गाजवलं
26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री मुंबई शहरावर 10 दहशतवाद्यांनी हल्ला केलेला. तेव्हा 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी सदानंद दाते हे अशा काही अधिकाऱ्यांमध्ये होते, जे अतिरेक्यांनी लक्ष्य केलेल्या ठिकाणी पहिल्यांदा पोहोचले आणि शेवटपर्यंत दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी प्रयत्न करत होते. याचवेळी दाते यांचं धैर्य आणि कठीण परिस्थितीतला समजुतदारपणा दिसला. ज्यामुळे अबू इस्माईल आणि अजमल कसाब यांनी ओलिस ठेवलेल्या लोकांची सुटका करण्यात यश आलं. त्यानंतर दोन दहशतवाद्यांपैकी एक असलेल्या कसाबला जिवंत पकडण्यात यश आलं. 26/11 च्या हल्ल्यात दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आलं.
सीआरपीएफ, आयबी, एटीएसमध्ये महत्त्वाची पदं भूषवली
सदानंद दाते, महाराष्ट्र एटीएसचे विद्यमान प्रमुख (एनआयएचे डीजी म्हणून नियुक्ती होईपर्यंत), त्यांनी केंद्रीय अन्वेषण ब्यूरोमध्ये डीआयजी आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) मध्ये आयजी (ऑप) म्हणूनही काम केलं आहे. मुंबईजवळील मीरा-भाईंदर आणि वसई-विरार शहरांचं पोलीस आयुक्तपदही त्यांनी भूषवलं आहे.
सदानंद दाते आहेत कोण?
सदानंद दाते हे गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ पोलीस सेवेत कार्यरत आहेत. पोलीस सेवेतल्या विविध अनुभवांवर त्यांनी 'वर्दीतील माणसांच्या नोंदी' हे पुस्तक लिहिलं आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच त्यांना यूपीएससी संदर्भात कळलं. त्यावेळीच त्यांनी पोलीस सेवेत जायचा निर्णय घेतला. समाजासाठी काहीतरी करण्याचा ध्यास त्या वयात त्यांनी घेतला होता. यूपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर आयएएस, आयपीएस आणि IA&AS असे तीन पर्याय होते. सदानंद दातेंनी आयपीएस हा पर्याय निवडला आणि पोलीस खात्यात आले.