बंगळुरु : कर्नाटकात आयपीएस अधिकाऱ्यावरच सायबर हल्ला झाल्याचे समोर आले आहे. इंटरनल सिक्युरिटी डिव्हिजन चीफ अशित मोहन प्रसाद यांना सायबर हल्ल्या करुन लुटण्यात आलंय. डेबिट कार्डच्या डिटेल्समुळे अवघ्या काही मिनिटांच्या अवधीत दोन लाखांचा गंडा घातला गेला. अशित मोहन प्रसाद हे 1985 सालच्या बॅचचे कर्नाटक केडरचे आयपीएस आहेत.
अशित प्रसाद यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, सीआयडीकडून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आलाय.
15 ऑक्टोबर 2018 रोजी म्हणजे सोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अशित प्रसाद यांना अनोळखी नंबरवरुन फोन आला. बँकेचा अधिकारी असल्याचे समोरुन सांगण्यात आले आणि प्रसाद यांच्याकडे डेबिट कार्डसंबंधी माहिती मागितली. प्रसाद हे कामात गुंतले होते. त्यामुळे त्यांनी फारशी सतर्कता बाळगली नाही. त्यात डेबिट कार्डचा कालावधी संपत असून, सुरु ठेवण्यासाठी सर्व माहिती आवश्यक आहे, असे सांगण्यात आल्याने प्रसाद यांनी डेबिट कार्डची माहिती देऊन टाकली.
त्यानंतर एका मिनिटाने प्रसाद यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला आणि त्यात लिहिले होते, “तुमच्या दोन अकाऊंटवरुन एक-एक लाख रुपये ट्रान्सफर केले गेलेत.”. त्यानंतर प्रसाद यांच्या लक्षात आले की, बँक अधिकाऱ्याच्या नावाने आपल्याला कुणीतीरी फसवलंय.
धक्कादायक म्हणजे, सोमवारी एकाच दिवशी एकूण 27 जणांना अज्ञातांनी फसवण्याचा प्रयत्न केला. त्यातील काहीजण फसले, तर काही जणांनी सतर्क होत कोणतीही माहिती दिली नाही.
दरम्यान, कर्नाटकात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. एकट्या बंगळुरुत सुमारे 3 हजार सायबर गुन्हे दाखल झाले आहेत. 2015 साली डीजीआयजीपी ओम प्रकाश यांना 10 हजार रुपयांना सायबर गुन्हेगारांना लुटण्यात आले होते. त्यावेळी दिल्लीतून अश्रफ अली नामक गुन्हेगाराला अटक करण्यात आली होती.