International Yoga Day : येत्या 21 जून रोजी जगभरात आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस (8th International Day of Yoga) साजरा करण्यात येणार आहे. भारतात देखील योगा दिवस साजरा केला जाणार आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आधी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसांनी (ITBP: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस) हिमाचल प्रदेशातील सर्वोच्च उंचीवरील सीमा चौक्यांवर योगाभ्यास केला. एएनआय या वृत्तसंस्थेने योगाभ्यास करणाऱ्या सैनिकांची फोटो ट्वीटरवर शेअर केले आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी ITBP च्या जवानांनी उत्तराखंड हिमालयातील 22,850 फूट उंचीवर बर्फाच्या मध्यभागी योगाभ्यास केला होता. तर ITBP गिर्यारोहक गेल्या आठवड्यात माउंट अबी गामिनच्या शिखरावर होते. तेथे त्यांनी बर्फाच्छादित पर्वतांमध्ये योगाभ्यास केला. "पर्वताच्या शिखरावर पोहोचताना ITBP गिर्यारोहकांच्या 14 सदस्यीय टीमने 1 जून रोजी बर्फामध्ये 20 मिनिटे योगाचा सराव केला, जो आतापर्यंतचा सर्वात उंचावरील योग व्यायाम ठरला आहे, अशी माहिती ITBP अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आयुष मंत्रालयाने 21 जून रोजी भारतासह जगभरात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी "मानवतेसाठी योग" ही थीम ठेवली आहे.
गेल्या दोन-अडीच वर्षांपासून जगभरात कोरोना महामारीचे संकट आहे. या काळात जगभरातील लोकांना त्यांचे आरोग्याचे महत्व समजले आहे. त्यामुळे यंदा योग दिवस मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. 'मानवतेसाठी योग' ही थीम निवडण्याचा उद्देश हा आहे की तो करुणा, दयाळूपणा, एकतेची भावना वाढवून आणि जगभरातील लोकांमध्ये लवचिकता निर्माण करून लोकांना एकत्र आणेल, अशी माहिती आयुष मंत्रालयाने दिली आहे. यावर्षी योग दिनानिमित्त प्रथमच सूर्याची हालचाल दाखविणारी ‘गार्डियन रिंग’ प्रदर्शित करण्यात येणार आहे.