Share Market: भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस 'ब्लॅक मंडे' ठरला आहे. विक्रीच्या सपाट्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये 1500 अंक आणि निफ्टीमध्ये 400 हून अधिक अंकांची घसरण झाली आहे. जागतिक शेअर बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. शेअर बाजारात आलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या सहा लाख कोटींचा चुराडा झाला आहे.
मागील आठवड्यात शेअर बाजारात घसरण झाली होती. शुक्रवारी बाजार बंद होताना शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalization ) 251.84 लाख कोटी रुपये होते. आज सकाळी झालेल्या घसरणीनंतर बाजार भांडवल 246.12 लाख कोटी रुपये झाले आहे. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण सुरू आहे. यामध्ये 3403 स्टॉक्सपैकी 2624 स्टॉकमध्ये विक्रीचा सपाटा सुरू आहे. फक्त 655 स्टॉक्समध्ये खरेदी सुरू आहे. तर, 241 स्टॉक्सच्या शेअर दरात लोअर सर्किट लागले आहे.
बाजारात घसरण का?
अमेरिकेत महागाईने उच्चांक गाठला आहे. अमेरिकेत महागाईने मागील 40 वर्षातील उच्चांक गाठला आहे. वाढत्या महागाईला नियंत्रित करण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरात वाढ होण्याची शक्यता आहे. फेडरल रिझर्व्हकडून 14 आणि 15 जून दरम्यान बैठक होणार आहे. या बैठकीत व्याज दरवाढीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अनेक परदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारातून आपली गुंतवणूक काढत असून सुरक्षित ठिकाणी गुंतवण्यासाठी शेअर विक्री करत आहेत.
डॉलरच्या तुलनेत रुपया गडगडला
डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुरू असलेली ऐतिहासिक घसरण कायम सुरू आहे. रुपयाने पहिल्यांदाच एका डॉलरच्या तुलनेत 78 रुपयाचा स्तर गाठला. आज रुपयात 43 पैशांची घसरण झाली. त्यामुळे आता एका डॉलरसाठी 78.28 रुपये मोजावे लागणार आहेत. परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री आणि अमेरिकेतील महागाई दर यामुळे एका डॉलरच्या तुलनेत रुपयांची ऐतिहासिक घसरण झाली आहे.