नवी दिल्ली : देशभरातील चित्रपटगृहांमध्ये आता राष्ट्रगीत अनिवार्य आहे. चित्रपट सुरु होण्यासाठी थिएटरमध्ये राष्ट्रगीतासह पडद्यावर राष्ट्रध्वज दाखवा, असा आदेशच सर्वोच्च न्यायालयाचा देशभरातील चित्रपटगृहांना दिला आहे.


पण राष्ट्रगीताचा किंवा राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यास कोणती शिक्षा होऊ शकते?

राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा अपमान केल्यास संविधानात काय म्हटलं आहे?

मूलभूत अधिकारासंबंधित संविधानातील कलमात लिहिलं आहे की, "संविधानाचं पालन करणं, तसंच निश्चित केलेल्या लक्ष्य आणि संस्थांचा सन्मान करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. यामध्ये राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचाही समावेश आहे.

याशिवाय द कॉन्स्टिट्यूशन (अॅप्लिकेशन टू जम्मू अँड काश्मीर) ऑर्डर 1945 मध्येही म्हटलं आहे की, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि संविधानाचा अपमान यासंबंधी प्रकरणात संसदेला कायदा बनवण्याचा विशेषाधिकार आहे.

चित्रपट सुरु होण्याआधी थिएटरमध्ये राष्ट्रगीत लावा : सर्वोच्च न्यायालय


 

राष्ट्रध्वज, राष्ट्रगीताचा अपमान केल्यास काय शिक्षा?

प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर अॅक्ट 1971 अंतर्गत राष्ट्रध्वज आणि संविधानाचा अपमान हा दंडनीय गुन्हा आहे. या अंतर्गत संबंधित व्यक्तीला 3 वर्षांचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते. याचप्रकारे जाणीवपूर्वक राष्ट्रगीत रोखणं किंवा राष्ट्रगीत गाण्यासाठी जमलेल्या समूहाला अडचणी निर्माण केल्यास जास्तीत जास्त 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते. या शिक्षेसह दंड भरण्याचा आदेशही दिला जाऊ शकतो.

 

राष्ट्रध्वजाचा अपमान कसा?

राष्ट्रध्वज जाळणं, खराब करणं, कुरुप करणं, नष्ट करणं किंवा कोणत्याही पद्धतीने राष्ट्रध्वजाचा अपमान करणं किंवा राष्ट्रध्वजाबाबत बोलणं किंवा लिहिणं, ही कारणंही राष्ट्रध्वजाचा अपमान असल्याचं मानलं जातं. पण या सेक्शनमध्ये राष्ट्रध्वजाबाबत असहमती, टीका करणं किंवा संशोधनाच्या उद्देशाने संविधानावर टीका करणं, हा अपमान मानलेला नाही. तिरंग्याचा सजावटीसारखा वापर करणंही अपमान मानला जातो. पण स्टेट फ्यूनरल, सैन्य आणि सुरक्षा यंत्रणांशी संबंधित जवानांच्या अंत्यसंस्कारासाठी या नियमातून सूट देण्यात आली आहे.

राष्ट्रगीत वाजवण्याच्या वेळेविषयी कोणता कायदा?

राष्ट्रगीत गाण्यासाठी आणि त्याची धून वाजवण्याबाबत काही दिशानिर्देश आहेत. पूर्ण राष्ट्रगीताची धून 52 सेकंदाची असते, तर त्याचं लहान व्हर्जन 20 सेकंदांचं आहे. राष्ट्रपती, राज्यपाल आणि अन्य महत्त्वाच्या व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या नॅशनल सॅल्यूटदरम्यान संपू्र्ण राष्ट्रगीत वाजवलं जातं. तर मेसमध्ये ड्रिंकिंग टोस्टच्या वेळी लहान व्हर्जनचं राष्ट्रगीत लावतात. राष्ट्रगीत गाण्याबाबत कोणताही नियम नाही. पण योग्य मर्यादा राखून राष्ट्रगीत गावं, अशी अट आहे. राष्ट्रगीत सुरु असताना तिथे उपस्थित असलेल्या लोकांना सावधानच्या मुद्रेत उभं राहावं.

मार्च 2016 मध्ये दिलेल्या एका आदेशात म्हटलं आहे की, जर एखाद्या सिनेमात, न्यूजरील किंवा डॉक्युमेंट्रीमध्ये राष्ट्रगीताचा वापर झाल्यास, प्रेक्षकांना उभं राहण्याची गरज नाही.