नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या उडाण योजनेअंतर्गत लवकरच लहान शहरांमध्ये विमान सेवा सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर लहान शहरात विमान सेवा सुरु करण्यासाठी इंडिगो एअर लाईन्स कंपनी 50 लहान विमानांची खरेदी करणार आहे. कंपनीने एटीआर प्रणालीच्या 50 विमान खरेदीचा प्रस्ताव तयार केला आहे.


कंपनी संचालक मंडळाच्या बैठकीनंतर याबाबतची घोषणा करण्यात आली. यासाठी फ्रान्सच्या कंपनीसोबत एटीआर 72-600 प्रणालीच्या 50 विमानांसाठी टर्मशीटवर स्वाक्षऱ्या झाल्या. या पहिल्या प्रयत्नात कंपनीला किती विमानांचा पुरवठा होऊ शकतो याचं निरिक्षण करुन या कराराला अंतिम रुप देण्यात येणार असल्याचं, यावेळी सांगण्यात आलं.

एटीआरच्या माध्यमातून 2017 च्या अखेरपर्यंत सर्व लहान शहरात उडाण योजनेअंतर्गत विमानसेवा सुरु करायचं कंपनीचं लक्ष्य असल्याचं इंडिगोचे अध्यक्ष आदित्य घोष यांनी यावेळी सांगितलं. घोष म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उडाण योजनेअंतर्गत आम्ही संपूर्ण देशात क्षेत्रीय विमान सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहोत. या माध्यमातून ज्या शहरांना विमान सेवेचा फायदा मिळाला नाही, त्यांना याचा सर्वाधिक फायदा होईल.”

केंद्र सरकारने लहान शहरांमध्ये विमानसेवा सुरु करण्यासाठी उडाण योजनेची घोषणा केली. यासाठी एटीआर विमानांमुळे लहान शहरात विमान सेवा सुरु करणं शक्य होणार आहे.  या अंतर्गत एका तासाच्या विमान सफरीसाठी प्रवाशांना 2500 रुपये मोजावे लागतील.

दरम्यान, विमानातील उपलब्ध सीटांच्या संख्येवरुनच दर ठरवले जातील. यासाठी एअर लाईन्स कंपनीना विमान भाडं आकारण्याचं स्वातंत्र्य असेल. पण दुसरीकडे 2500 रुपयापर्यंतच्या विमान प्रवासासाठी एअरलाईन्स कंपन्यांकडून सवलतही देण्यात येत आहेत.

केंद्र सरकारकडून उडाण योजना सुरु करण्यासाठी निविदा मागवण्यात येणार आहेत. यामध्ये इंडिगो एअर लाईन्स ही कंपनीदेखील सहभागी होण्याची शक्यता आहे.

सध्या देशाअंतर्गत विमान सेवा क्षेत्रात इंडिगो एअर लाईन्सची 40 टक्के भागिदारी आहे. तसेच कंपनीच्या ताफ्यात 133 विमान असून, हे सर्व एअरबस ए-320 प्रणालीवर कार्यरत आहेत. नुकत्याच कंपनीने एका दिवसात 896 विमान फेऱ्या केल्या आहेत.

कंपनीने या आधी 2005 मध्ये 100 विमानांच्या खरेदीसाठी विमान बनवणाऱ्या कंपनीला प्रस्ताव दिला होता. तर 2011 मध्ये 180 आणि 2015 मध्ये 250 विमानांच्या खरेदीसाठी प्रस्ताव दिला.

दरम्यान, कंपनीला गेल्या आर्थिक वर्षात 18 हजार 580 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळालं असून, यात 1659.18 कोटी रुपये निव्वळ नफा होता. मात्र हे वर्ष नुकसानकारक ठरल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. पण तरीही कंपनीने आपल्या भाग भांडवलदारांना (शेअर होल्डरना) प्रति शेअर 34 रुपयांचा डिव्हीडंट देण्याची घोषणा केली आहे.