मुंबई : भारतात गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी ही नेहमीच चिंतेची बाब राहिलेली आहे. याचदरम्यान एक अहवाल आला आहे. जून 2017 ते जून 2018 पर्यंत देशात दहा लाख डॉलर म्हणजे 7.3 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असणाऱ्या श्रीमंतांची संख्या 7300 ने वाढली आहे. एका अहवालानुसार, भारतात या श्रेणीतील श्रीमंतांची संख्या 3.43 लाखापर्यंत पोहोचली आहे. या लोकांची एकूण संपत्ती सहा हजार अब्ज डॉलरच्या आसपास आहे.


आर्थिक सेवा कंपनी क्रेडिट सुसीचा हा अहवाल आहे. या अहवालानुसार, भारत सर्वाधिक महिला अब्जाधीशांची संख्या (एक अब्ज डॉलर म्हणजेच 73.5 अब्ज रुपये) असणारा देश आहे. या अभ्यासादरम्यान जगातील 18.6 टक्के अब्जाधीश महिला या एकट्या भारतात आहेत, असं आढळून आलं.

या अहवालानुसार, जून 2018 पर्यंत देशात 10 लाख डॉलर किंवा त्यापेक्षा अधिकची संपत्ती असणाऱ्या श्रीमंतांची संख्या 343000 राहण्याचा अंदाज आहे. गेल्या एका वर्षात या श्रेणीतील श्रीमंतांची संख्या 7300 ने वाढली आहे.

नव्या श्रीमंतांमध्ये 3400 जणांची संपत्ती पाच कोटी डॉलर (जवळपास 36.5 कोटी रुपये) आणि 1500 जणांची संपत्ती 10 कोटी डॉलर (जवळपास 73 कोटी रुपये) पेक्षा अधिक आहे. या काळात देशाच्या संपत्तीत 2.6 टक्क्यांची वाढ दिसून आली असून एकूण संपत्ती आता सहा हजार अब्ज डॉलर झाली आहे. पण प्रति व्यक्ती संपत्ती 7020 डॉलर एवढीच आहे. कारण, रुपयाची घसरण सुरुच आहे.

या अहवालानुसार, 2023 पर्यंत श्रीमंत आणि गरीब यांच्यातील फरक वाढणार आहे. ही असमानता 53 टक्क्यांच्या वर जाण्याचा अंदाज आहे. देशामध्ये 526000 असे श्रीमंत असतील, ज्यांची संपत्ती 8800 अब्ज डॉलर असेल आणि गरीब-श्रीमंतांच्या दरीत 53 टक्क्यांची वाढ होईल.

भारतात वैयक्तिक संपत्ती जमीन आणि इतर अचल संपत्तीच्या रुपात आहे. कौटुंबीक संपत्तीमध्ये या संपत्तीचा एकूण 91 टक्के समावेश आहे.