मुंबई : भारताचे पहिले पंतप्रधान (India first PM) असं गुगलमध्ये टाईप केल्यानंतर येणारं उत्तर आणि फोटो पाहून अनेक यूझर अवाक झाले होते. गुगल इंडियाकडून असा खोडसाळपणा करण्यात आला की अल्गोरिदममध्ये चूक झाली, याचं उत्तर सोशल मीडियावर जो-तो शोधत होता.

'इंडिया फर्स्ट पीएम' असं टाईप केल्यानंतर विकीपीडियाची एक लिंक गुगलवर येत होती. त्याबरोबर येणारं उत्तर जवाहरलाल नेहरु हेच होतं, मात्र फोटो नेहरुंचा नव्हता. मग कोणाचा होता? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर उत्तर आहे - सध्याचे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा!

विकीपीडियाच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर भारतीय पंतप्रधानांची अथपासून इतिपर्यंत योग्यच क्रमवारी दिसत होती. पहिले पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरु यांचं नाव आणि त्यांचाच फोटो दिसत होता, तर सध्याच्या पंतप्रधानांपुढे मोदींचं नाव आणि फोटोही होता, मग पहिल्या पानावर ही चूक झालीच कशी, हा प्रश्न सर्वांना छळत आहे.

फक्त पंतप्रधानच नाही, तर पहिले अर्थमंत्री, पहिले संरक्षणमंत्री यांच्या बाबतीतही हीच चूक झाली होती. पहिले अर्थमंत्री म्हणून षणमुखम चेट्टी यांचं नाव आणि अरुण जेटलींचा फोटो, तर पहिले संरक्षणमंत्री म्हणून बलदेव सिंह यांचं नाव आणि निर्मला सीतारमन यांचा फोटो दिसत होता.



गुगल इंडियाचं लक्ष या घटनेकडे वेधल्यानंतर बुधवारपासून दिसणारा हा इश्यू गुरुवार दुपारपर्यंत सोडवण्यात आला. गुगलची तांत्रिक चूक असली तरी अनेकांनी त्यानिमित्ताने 'राजकीय गोळाफेक' करुन घेतली. कारण अनेक जणांच्या मोबाईलमध्ये या प्रकाराचे स्क्रीनशॉट्स फिरायला लागले होते.