नवी दिल्ली : नवी वर्षाच्या सुरूवातीलाच इस्रोचे संचालक के. सिवन यांनी 2020मधील इस्त्रोचे प्रोजेक्ट्स आणि इतर योजनांबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, तमिळनाडूतील तूतुकुडीमध्ये नवीन स्पेस पोर्ट तयार करण्यात येणार आहे. वर्ष 2020मध्ये गगनयान आणि चांद्रयान-3 मिशनसाठी करण्यात आलेल्या तयारीबाबतही त्यांनी माहिती दिली. त्याचबरोबर याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, अंतराळ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्हाला देशातील जनतेच्या जीवनात आणखी सुधारणा करायच्या आहेत. इस्त्रो प्रमुखांनी सांगितले की, दोन्ही महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट्साठी आवश्यक असणारी पूर्वतयारी मागील वर्षी करण्यात आली आहे.


इस्त्रो चीफ के. सिवन यांनी सांगितले की, चांद्रयान-3 ला सरकारची परवानगी मिळाली आहे. चांद्रयान-3 अगदी चांद्रयान-2 सारखंच असणार आहे. परंतु, यावेळी फक्त लँडर-रोवर आणि प्रोपल्शन मॉडेल असेल. यामध्ये ऑर्बिटर पाठवण्यात येणार नाही. कारण चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरकडून यासाठी मदत घेण्यात येणार आहे.


इस्त्रो चीफ के. सिवन यांनी सांगितले की, चांद्रयान-2 मधील लँडरची गती जास्त असल्यामुळे योग्य पद्धतीने नेवीगेट करू शकत नाही आणि यामुळेच हार्ड लँडिंग झाली आहे. तसेच चुकीचा आरोप लावण्यात येत आहे की, चांद्रयान-2 अयशस्वी झाल्यामुळे इतर सॅटेलाइट्सच्या लॉन्चिंगमध्ये उशीर होत आहे. पण हा समज अत्यंत चुकीचा आहे. सॅटेलाइट लॉन्च करण्यासाठी रॉकेट्स तयार करण्यात येतात. जसं आमच्याकडे रॉकेट्स उपलब्ध होतात, त्यावेळी आम्ही लॉन्च करतो. तसेच 2020 मार्चपर्यंत आम्ही 2019मधील सर्व सॅटेलाइट्स लॉन्च करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

गगनयान अंतराळवीरांची निवड

सिवन यांनी बोलताना सांगितले की, गगनयान मिशनसाठी 4 अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे. इस्त्रो चीफ यांनी सांगितले की, 2019मध्ये गगनयान मिशनवर आम्ही योग्य ते काम उत्तम रित्या केलं आहे. या मिशनसाठी चार अंतराळवीरांची निवडही करण्यात आली आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून त्यांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे. ही ट्रेनिंग रशियामध्ये देण्यात येणार आहे. तसेच गगनयानसाठी नॅशनल अॅडवायझरी कमिटीची स्थापना करण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं.


तूतुकुडीमध्ये असणार देशाचं दुसरं स्पेस पोर्ट

देशातील दुसऱ्या स्पेस पोर्टबाबत बोलताना सिवनने सांगितलं की, यासाठी भूमि अधिग्रहण सुरू करण्यात आलं आहे. दुसरं पोर्ट स्टेशन तमिळनाडूतील तूतुकुडीमध्ये होणार आहे. दरम्यान, येत्या दशकात इस्त्रोच्या पेटाऱ्यामध्ये मंगळ ग्रहापासून शनि ग्रहापर्यंत अनेक महत्त्वकाँशी प्रोजेक्ट आहेत. ज्यांच्यावर वेगाने काम सुरू आहे. इस्त्रोच्या गगनयान मिशनसाठी रशिया मदत करणार आहे.