अॅडलेड : पॅसिफिक स्कूल गेम्समध्ये सहभागी झालेल्या भारताच्या 18 वर्षांखालील फुटबॉल संघातल्या विद्यार्थिनीचा ऑस्ट्रेलियात बुडून मृत्यू झाला. अॅडलेडमध्ये ग्लेनेग बीचवर पोहताना पाच विद्यार्थिनी वाहून गेल्या, त्यापैकी चौघींना वाचवण्यात यश आलं.


स्थानिक वेळेनुसार रविवारी संध्याकाळी भारताच्या अंडर 18 फुटबॉल संघातील पाच तरुणी पोहत होत्या. अचानक आलेल्या मोठ्या लाटेमुळे त्या बुडू लागल्या. जीवरक्षकांना त्यापैकी तिघींना वाचवण्यात यश आलं, तर चौथ्या तरुणीला होल्डफास्ट मरिनाजवळ बाहेर काढण्यात आलं. 15 वर्षीय नितीशा नेगीचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसातच्या सुमारास पोलिसांना आढळला.

ऑस्ट्रेलियातील आयोजकांतर्फे भारतीय संघ, मृत विद्यार्थिनीचे कुटुंबीय आणि मित्रांना सांत्वनपर संदेश पाठवण्यात आला. त्याचप्रमाणे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या चार विद्यार्थिनींचीही काळजी व्यक्त करण्यात आली.

मयत नितीशाच्या वडिलांनी संबंधितांना आपल्या मुलीचा मृतदेह लवकरात लवकर भारतात पाठवण्याची विनंती केली आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

ही घटना घडली त्या ग्लेनेगमधील ब्रेकवॉटर भागात गेल्या वर्षी 11 वर्षांच्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला होता, तर त्यापूर्वी 17 वर्षांच्या एका तरुणानेही जीव गमावला होता.