मुंबई : चांगले रस्ते आणि मोकळे फुटपाथ हा नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे, असं मत मुंबई उच्च न्यायालयाने अनेकदा नोंदवलं आहे. हायकोर्टाने विविध खटल्यांवेळी नोंदवलेलं हे मत किती महत्त्वाचं आहे आणि याकडे आपल्या देशात किती दुर्लक्ष होतंय, याचं वास्तव दाखवणारी एक आकडेवारी समोर आली आहे, ज्यात महाराष्ट्रही आघाडीवर आहे.


देशातले रस्ते पायी चालणाऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत. 2017 या वर्षात देशातल्या रस्त्यांवर दररोज 56 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या या घटनांमध्ये घट होण्याऐवजी वाढ होत आहे. 2014 मध्ये अशा घटनेत 12 हजार 330 पादचाऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर 2017 मध्ये 20 हजार 457 पादचाऱ्यांनी रस्त्यावरुन चालताना आपला जीव गमावला आहे.

देशातले रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात असुरक्षित आहेत. कारण, या रस्त्यांवर बचावात्मक संसाधनांची कमी आहे. या मृत्यूच्या सूचीमध्ये सायकलस्वार आणि दुचाकीस्वारांनाही ठेवण्यात आलं आहे आणि सरकारी आकडेवारीनुसार देशात गेल्या एका वर्षात दररोज 133 दुचाकीस्वार आणि 10 सायकलस्वारांचा रस्त्यावर मृत्यू झाला आहे.

कोणत्या राज्यात स्थिती जास्त खराब?

रस्त्यावर सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या राज्यांमध्ये तामिळनाडूची स्थिती सर्वात खराब आहे. गेल्या वर्षात तामिळनाडूमध्ये दररोज 3507 जणांनी आपला जीव गमावलाय. तामिळनाडूनंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो, जिथे 1831 जणांनी जीव गमावला. आंध्र प्रदेशमध्ये 1379 जणांचा जीव गेला आहे. दुचाकीस्वारांच्या सर्वाधिक मृत्यूमध्येही तामिळनाडूची परिस्थिती वाईट आहे. तामिळनाडूत 6329, उत्तर प्रदेशात 5699 आणि महाराष्ट्रात 4569 दुचाकीस्वारांचा जीव गेला.

विकसित देशांच्या तुलनेत आपल्या देशामध्ये पायी चालणाऱ्यांविषयी वाहनचालकांच्या मनात आदर कमी आहे, असं नुकतंच या आकडेवारीवर बोलताना परिवहन विभागाच्या सचिवांनी म्हटलं होतं. देशातील रस्त्यावर गाडी पार्क करणं किंवा छोट्या दुकानदारांकडून अतिक्रमण करण्याच्या घटना सर्वसाधारण झाल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय रोड फेडरेशनच्या के. के. कपिला यांच्या मते, रस्त्यावर सर्वाधिक मृत्यू होण्याचा हा प्रकार दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्येही होतो. पादचाऱ्यांसाठी सुरक्षित रस्ते कसे निर्माण करता येतील यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. पादचाऱ्यांसाठी आणि वाहनांसाठी स्वतंत्र रस्ते ठेवण्यावर भर देणं गरजेचं असल्याचंही कपिला यांनी सांगितलं.

जाणकारांच्या मते, वाहनांमधील आधुनिक ब्रेक सिस्टम अँटी ब्रेकिंगच्या माध्यमातूनही अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल. अँटी ब्रेकिंगमुळे गाडी जागेवर थांबते, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये दुर्घटना टाळली जाऊ शकते.