नवी दिल्ली : लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान रेल्वे तिकीट कन्फर्म न झाल्यास अनेकदा त्रास वाढतो. यावर रेल्वे मंत्रालयाने नामी उपाय शोधला आहे. ‘विकल्प’ नामक योजना रेल्वे मंत्रालयाने आणली आहे. या योजनेनुसार आता कन्फर्म तिकीट नसलं, तरी काळजी करण्याचं कारण्याचं कारण उरणार नाही.


विकल्प योजना काय आहे?

मेल किंवा एक्स्प्रेसचं तिकीट काढल्यानंतरही वेटिंग लिस्टमध्ये असणाऱ्यांसाठी विकल्प योजना आहे. या योजनेनुसार, वेटिंग लिस्टमध्ये असणाऱ्या प्रवाशांना त्याच मार्गावरील दुसऱ्या ट्रेनमध्ये जागा असल्यास, त्या ट्रेनचं कन्फर्म तिकीट दिलं जाईल. म्हणजेच वेटिंग लिस्टमध्ये असल्याने वाढणारी धाकधूक कमी होण्यास मदत होईल.

उदाहरणार्थ -

जर तुमचं तिकीट ‘तुफान’ एक्स्प्रेसचं आहे आणि तुमचं तिकीट कन्फर्म झालं नाही. तर त्याच मार्गावरील राजधानी एक्स्प्रेसमध्ये सीट रिकामी असल्यास, तिथे तुम्हाला कन्फर्म तिकीट दिलं जाईल.

विकल्प निवडणं बंधनकारक

एक एप्रिलपासून लागू होणाऱ्या या योजनेनुसार, सुरुवातील ज्या ट्रेनचं तिकीट बुक करत असाल, त्यावेळी ‘विकल्प’ निवडणं आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्हाला कन्फर्म तिकीट न मिळाल्यास, पर्याय निवडलेल्या ट्रेनची कन्फर्म तिकीट मिळू शकेल.

अतिरिक्त शुल्क नाही !

विशेष म्हणजे यासाठी कोणताही अतिरिक्त शुल्क आकारला जाणार नाही. मात्र, तुमच्या मूळ तिकिटाच्या रकमेहून कमी रकमेचं तिकीट असलेल्या ट्रेनमध्ये जागा मिळाल्यास, उर्वरित रक्कम परत मिळणार नाही. म्हणजेच अतिरिक्त शुल्कही नाही आणि रक्कम उरल्यास रिफंडची सुविधाही नाही.

‘विकल्प’ योजनेची सुरुवात 1 एप्रिलपासून संपूर्ण देशभर लागू होणार आहे. आतापर्यंत केवळ दिल्ली ते लखनौ, दिल्ली ते जम्मू, दिल्ली ते चेन्नई, दिल्ली ते हावडा या मार्गावरच या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती.

वेगवेगळ्या कारणांमुळे तिकीट रद्द केल्याने वर्षभरात जवळपास 7 हजार 500 कोटी रुपये रेल्वेकडून प्रवाशांना परत द्यावे लागतात. त्यामुळे ‘विकल्प’ योजनेमुळे यात फरक पडेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, 1 नोव्हेंबरपासून विकल्प योजना सुरु करण्यात आली होती. मात्र, ती केवळ सहा मार्गावरच होती. आता देशभर लागू करण्यात आली असून, ऑनलाईन तिकीट बुकिंगमध्येही योजना सुरु केली आहे. येत्या काही दिवसात तिकीट खिडकीवरही विकल्प योजना सुरु करण्यात येईल.