नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांची मानहानी केल्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. दिल्लीच्या पटियाला न्यायालयानं अरविंद केजरीवाल यांच्यासह आपच्या पाच नेत्यांवर आरोप निश्चित केले आहेत. या सर्वांनी आपण निर्दोष असल्याचं न्यायालयात सांगितलं. 20 मे पासून या प्रकरणाच्या सुनावणीला सुरूवात होणार आहे.
भ्रष्टाचाराव्यतिरिक्त अनेक गैरव्यवहारांमध्ये डीडीसीएचे पदाधिकारी गुंतलेले आहेत, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला होता. त्यानंतर अरविंद केजरीवालांवर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला.
मानहानीचा खटला का?
भ्रष्टाचारव्यतिरिक्त अनेक गैरव्यवहारांमध्ये डीडीसीए अर्थात दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी गुंतलेले आहेत, असा आरोप आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. एका वृत्तवाहिनीशी बोलताना केजरीवालांनी केलेला हा आरोप त्यांना आता महागात पडण्याची चिन्ह आहेत. कारण केजरीवालांच्या आरोपांमुळे डीडीसीएची प्रतिमा मलीन झाल्याचा आरोप करत, डीडीसीए आणि क्रिकेटर चेतन चौहान यांनी केजरीवालांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. डीडीसीएच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचेही डीडीसीएने आपल्या अर्जात म्हटले होते. दरम्यान, केजरीवालांच्या वक्तव्यामुळे डीडीसीएची प्रतिमा डागाळल्याचं न्यायालयाने मान्य केलं होतं.
डीडीसीएचं प्रकरण नेमकं काय आहे?
‘डीडीसीए’ म्हणजेच ‘दिल्ली अँड डिस्ट्रिक्टस क्रिकेट असोसिएशन’ ही बीसीसीआयला संलग्न असलेली राज्य असोसिएशन दिल्लीतल्या क्रिकेटचं नियंत्रण करते. अरुण जेटली हे 1999 ते 2012 अशी सलग 13 वर्ष डीडीसीएचे अध्यक्ष आहेत. सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे प्रधान सचिव राजेंद्रकुमार यांची चौकशी करण्याचं कारण देऊन मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर धाड घातल्याचं निमित्त झालं आणि आपच्या नेत्यांनी डीडीसीएतल्या भ्रष्टाचाराचा पेटाराच उघडला.
अरुण जेटलींच्या 13 वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत डीडीसीए म्हणजे आर्थिक गैरव्यवहाराचं माहेरघर बनल्याचा मुख्य आरोप आहे. दुसरा आरोप म्हणजे भ्रष्टाचारी पदाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी करुनही जेटलींनी कधीही कारवाई केली नाही. जेटलींच्या कारकीर्दीत डीडीसीएला फिरोजशहा कोटला स्टेडिअमसाठी नियम धाब्यावर बसवून परवानगी मिळाल्या.
भारताचा माजी कसोटीवीर आणि भाजप नेते कीर्ती आझाद यांनी केलेल्या आरोपानुसार 2000 ते 2007 या कालावधीत कोटला स्टेडियमची दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी एकूण 24 कोटी रुपयांचं बजेट निश्चित करण्यात आलं होतं, पण प्रत्यक्षात तो खर्च 141 कोटी रुपयांवर गेला. भाजपमध्य असूनही कीर्ती आझाद यांनी डीडीसीए आणि अध्यक्ष अरुण जेटली यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे.
ऑगस्ट 2009 मध्ये वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, आशीष नेहरा आणि इशांत शर्मा यांनीही डीडीसीएच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली होती.
अखेर भारताचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी आणि कीर्ती आझाद यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर दिल्ली सरकारने 12 नोव्हेंबर 2015 रोजी डीडीसीएतल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची नियुक्ती केली होती.