नवी दिल्ली : लॉकडाऊनमध्ये देशभरात अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांसाठी श्रमिक स्पेशल ट्रेन चालवल्यानंतर आता सर्वसामान्य प्रवाशांसाठीही रेल्वे विशेष ट्रेन सेवा सुरू करणार आहे. या विशेष रेल्वे सेवांची वाहतूक मंगळवार, 12 मे 2020 पासून होणार आहे. राजधानी नवी दिल्लीतून देशभरातल्या 15 ठिकाणी या रेल्वेसेवा सुरू केल्या जातील. 15 ट्रेन जाणार आणि तिथून दिल्लीत परतणार अशा 30 फेऱ्यांना रेल्वे बोर्डाने मंजुरी दिलीय.


लॉकडाऊनमुळे देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. नवी दिल्लीतून मुंबई सेंट्रल, मडगाव (गोवा) अहमदाबाद, बंगळुरु, चेन्नई, तिरुवनंतपुरम, सिकंदराबाद, भुवनेश्वर, रांची, विलासपूर, पाटणा, आगरतळा, हावडा, दिब्रुगड आणि जम्मू तवी अशा 15 ठिकाणी या विशेष ट्रेन सेवा असणार आहे.


स्थलांतरित मजुरांसाठी महामार्गांवर विश्रामगृहाची व्यवस्था; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


मंगळवार, 12 मे पासून सुरु होणाऱ्या या 15 स्पेशल ट्रेनसाठी आरक्षण (https://www.irctc.co.in/) या साईटवर उद्या दुपारी चार वाजल्यापासून उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेला लॉकडाऊन 17 तारखेपर्यंत सुरू असल्यामुळे रेल्वेचे तिकीट काऊंटर सुरु होणार नाहीत, त्यामुळे या स्पेशल सेवांची तिकीट विक्री ऑनलाईन म्हणजे फक्त आयआरसीटीसीद्वारेच होणार आहे.


हा दिल्लीतून देशातल्या 15 ठिकाणी आणि परत असा 30 सेवांचा टप्पा संपल्यानंतर आणखीही काही नव्या मार्गांवर रेल्वे सेवा सुरू करण्याचा रेल्वेचा मानस आहे. त्याचा निर्णय नव्या कोचच्या उपलब्धतेनुसार केला जाणार आहे. कोविड 19 च्या उपचारासाठी रेल्वेने तब्बल वीस हजार रेल्वेच्या डब्यांमध्ये आयसोलेशन सेंटर सुरु केले आहेत. त्याशिवाय सध्या देशभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या 300 श्रमिक स्पेशल सेवांसाठी काही डबे राखीव ठेवण्यात आले आहेत.


रेल्वेच्या तिकीट काऊंटरवर प्लॅटफॉर्म तिकिटांचीही विक्री होणार नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे ऑनलाईन बुकिंग केलेलं कन्फर्म तिकीट असेल त्यांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश मिळेल, असं रेल्वेने जाहीर केलंय. या विशेष ट्रेनचं कन्फर्म तिकीट मिळालेल्या प्रवाशांना फेस मास्क आणि थर्मल स्क्रीनिंग अनिवार्य करण्यात आलं आहे. कोविड 19 ची कोणतीही लक्षणे नसलेल्यांनाच या स्पेशल ट्रेनमधीन प्रवास करता येणार आहे. म्हणजेच कन्फर्म तिकीट असल्यानंतरही प्रत्यक्ष स्क्रीनिंग आणि तपासणीनंतरच प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. या ट्रेनचं वेळापत्रक आणि अन्य तपशील रेल्वे नंतर जाहीर करणार आहे.


कशा असणार ट्रेन

  • या ट्रेन नॉनस्टॉप नसतील पण केवळ मर्यादित स्टॉप असणार.

  • या सर्व ट्रेनमध्ये केवळ एसी कोच असणार आहेत.

  • या ट्रेन साठीच भाडं साधारणपणे राजधानीसारखं असणार आहे असं रेल्वे अधिकारी सांगतायत.

  • प्रायोगिक तत्त्वावर धावणाऱ्या सर्व राजधानी एक्सप्रेस असणार.


Lockdown 3 | परराज्यातील मजुरांसाठी सांगली, जालन्यातून विशेष रेल्वे धावणार