Indian Light Tank Zorawar : नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या स्वदेशी लाईट वेट टँक जोरावरच्या (Zorawar) डेवलपमेंट ट्रायल्स सुरू झाल्या आहेत. याच्या यूजर ट्रायल्सही एप्रिलपर्यंत सुरू करण्याचा डीआरडीओचा (DRDO) प्रयत्न आहे. दोन्ही ट्रायल्स भारतीय लष्कराकडून केल्या जाणार आहेत. डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्वदेशी लाईट वेट टँकमध्ये इंजिन बसवण्यात आले असून सध्या 100 किलोमीटरपर्यंत हा टँक चालवून पाहण्यात आलेलं आहे.


भारतीय लष्करानं डीआरडीओला 59 जोरावर रणगाडे बनवण्याची ऑर्डर दिली होती. हे टँक एल अँड टी (L&T) कंपनीद्वारे तयार केले जात आहेत. या टँकचं डिझाईन डीआरडीओनं तयार केलेलं आहे. याशिवाय 259 लाईट टँकची मागणी असून त्यासाठी सात ते आठ कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे. भारतीय लष्कर चीन सीमेजवळ लडाखमध्ये झोरावर रणगाडे तैनात करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. 


जोरावरला पंजाबी भाषेत बहादूर म्हणतात. हे एक आर्मर्ड फायटिंग व्हेइकल आहे. याच्या कवचावर कोणत्याही हत्यारानं करण्यात आलेल्या हल्ल्याचा परिणाम होणार नाही. शत्रूनं कोणत्याही शस्त्रानं हल्ला केला, तरीदेखील या रणगाड्यामध्ये असलेले जवान सुरक्षीत राहतली, असा दावा डीआरडीओनं केला आहे. या रणगाड्याच्या मारक क्षमतेबाबत बोलायचं झालं तर, हा सर्वात वेगानं पुढे जाऊ शकतो. तसेच, यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली बसवण्यात येणार आहे. 


25 टनाचा हलका टँक, केवळ तीनच जण चालवणार 


जोरावर टँक DRDO नं डिझाइन केलेला आहे. या रणगाड्याचे काही फोटोही समोर आले आहेत. हा रणगाडा तयार करण्याचं काम लार्सेन एंड टुर्बो यांना देण्यात आलं आहे. भारतीय सेनेला अशा 350 रणगाड्यांची गरज आहे. हा रणगाडा 25 टन वजनाचा आहे. तसेच, हा रणगाडा चालवण्यासाठी केवळ तीन लोकांची गरज लागणार आहे. 


चीन-शीख युद्धातील योद्ध्याचे नाव


1841 मध्ये चीन-शीख युद्धादरम्यान कैलास-मानसरोवरवर लष्करी मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या जनरल जोरावर सिंह कहलुरिया यांच्या नावावरून या रणगाड्याला नाव देण्यात आलं आहे. सर्वात आधी रशियाकडून असे रणगाडे खरेदी करण्याचा भारताचा मानस होता. पण नंतर देशात हे रणगाडे बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. खरं तर, हा देशातील पहिला टँक असेल ज्याला माउंटन टँक म्हणता येईल.






हेलिकॉप्टरनंही नेता येणार 


जोरावर टँक हलके असल्यानं ते कुठेही उचलून नेणं सहज शक्य असणार आहे. त्याची कॉर्ड 120 मिमी असेल. स्वयंचलित लोडर असेल. एक रिमोट वेपन स्टेशन असेल, ज्यामध्ये 12.7 मिमी हेव्ही मशीन गन स्थापित केली जाईल. त्याच्या चाचण्या 2024 पर्यंत सुरू राहतील. त्यानंतर हा रणगाडा लष्कराच्या ताब्यात दिला जाईल.


चीनकडूनही सीमेवर हलके रणगाडेही तैनात


जोरावरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोन इंटिग्रेशन, ऍक्टिव्ह प्रोटेक्शन सिस्टीम, हाय डिग्री ऑफ सिच्युएशनल अवेअरनेस यांसारखं तंत्रज्ञान देखील असेल. शिवाय, यात क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता असेल. शत्रूचं ड्रोन पाडण्यासाठी उपकरणं आणि इशारा देणारी यंत्रणाही बसवण्यात येणार आहे. चीननं आपल्या बाजूनं तैनात केलेल्या रणगाड्यांचं वजन 33 टनांपेक्षा कमी आहे. ते सहजपणे एअरलिफ्ट केलं जाऊ शकतात.