PM Narendra Modi News: आपण नेहमी लोकप्रतिनिधींवर होणाऱ्या खर्चांबाबत चर्चा करत असतो. लोकप्रतिनिधींना मिळणारा पगार तसंच त्यांना मिळणाऱ्या इतर खास सुविधांवरुन अनेकदा लोकप्रतिनिधींवर सवाल देखील उपस्थित केले जातात. यात नेत्यांच्या खानपानाची देखील विशेष चर्चा होते. मात्र यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे अपवाद असल्याचं समोर आलं आहे. एका आरटीआयमधून (RTI)अशी माहिती मिळाली आहे की, पंतप्रधान मोदी स्वतःच्या खानपानाचा खर्च स्वत: उचलतात आणि सरकारी बजेटमधून त्यांच्या खानपानावर एक रुपयाही खर्च केला जात नाही.


पंतप्रधान कार्यालयाने (PMO) आरटीआयद्वारे विचारलेल्या प्रश्नावर ही माहिती दिली आहे. पंतप्रधान कार्यालयाचे सचिव विनोद बिहारी सिंह यांनी आरटीआयला उत्तर दिले आहे की, सरकारी बजेटमधून पंतप्रधानांच्या जेवणावर एक रुपयाही खर्च होत नाही.


यासोबतच पंतप्रधानांचे निवासस्थानाची (PM House) जबाबदारी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. तर वाहनांची जबाबदारी एसपीजीकडे आहे. या आरटीआयमध्ये पगाराशी संबंधित माहितीही आरटीआयमध्ये मागितली होती, मात्र या प्रश्नाच्या उत्तरात केवळ नियमांचा संदर्भ देऊन नियमानुसार वेतनवाढ करण्याची माहिती देण्यात आली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर संसदेत एन्ट्री घेतली आणि देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले.  यानंतर 2 मार्च 2015 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान त्यांनी संसद भवनाच्या पहिल्या मजल्यावरील कॅन्टीनमध्ये जात सर्वांना चकित केले.


सध्याच्या सरकारने संसदेत चालणाऱ्या कॅन्टीनबाबत अनेक सुधारणा केल्या आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 19 जानेवारी 2021 रोजी संसदेच्या कॅन्टीनमध्ये खासदारांना दिले जाणारे अनुदान रद्द केले होते. 2021 पूर्वी संसदेच्या कॅन्टीनमध्ये अनुदानावर 17 कोटी रुपये खर्च केले जात होते, अशी माहिती समोर आली होती. 


पंतप्रधान मोदी यांच्या खानपानाविषयी अनेकदा चर्चा समोर आली आहे. खासकरुन ते महागडे मशरुम खातात असं वृत्त समोर आलं होतं. तसंच सरकारी खर्चाच्या उधळपट्टीवरुन सोशल मीडियावर देखील बऱ्याचदा त्यांच्यावर टीका होत असल्याचं पाहायला मिळालं होतं. पण पंतप्रधान मोदी आपल्या खानपानाचा खर्च आपल्याच खिशातून करत असल्याचं आरटीआयमधून समोर आलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


देशात दर तासाला 5 जणांच्या आत्महत्या, तर पंतप्रधानांच्या मित्राच्या संपत्तीत तासाला 85 कोटींची भर; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा


Mann Ki Baat LIVE : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे रंग केवळ भारतातच नाही तर जगभरात; पंतप्रधानांकडून कौतुक