China Issues Stapled Visa : लडाखमधील गलवान खोऱ्यात 2020 मध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारत (India)आणि चीनमधील (China) तणाव शिगेला पोहोचला आहे. त्यानंतर आता स्टेपल्ड व्हिसाच्या (Stapled Visa) वादावरुन दोन्ही देश पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. चीनमध्ये खेळवल्या जात असलेल्या वर्ल्ड युनिवर्सिटी गेम्ससाठी भारतीय मार्शल आर्ट (वुशू) टीममधील अरुणाचल प्रदेशच्या (Arunachal Pradesh) खेळाडूंना चीनकडून स्टेपल्ड व्हिसा जारी करण्यात आला आहे. त्यामुळे भारत सरकारने त्यांना चीनला पाठवण्यास नकार दिला. भारताने वुशू संघातील सर्व खेळाडूंना विमानतळावरुन परत बोलावलं आहे. "हे मान्य नाही," असं सरकारने म्हटलं आहे. भारत सरकारने हे प्रकरण खूप गांभीर्याने घेतलं आहे. अरुणाचल प्रदेशला चीन स्वतःचा भूभाग मानत असल्यामुळे तिथल्या खेळाडूंना स्टेपल्ड व्हिसा देण्यात आला. ही चीनची आगळीक किंवा कुरापत आहे.


चीनमधील चेंगडू इथे 28 जुलै ते 8 ऑगस्ट 2023 दरम्यान, FISU (Federation Internationale du Sport Universitaire) जागतिक विद्यापीठ खेळ आयोजित करण्यात आले आहेत. त्यासाठी भारताचा संघही सहभागी झाला आहे. भारतीय वुशू संघातील काही खेळाडूंना खेळांमध्ये भाग घेण्यासाठी 26 जुलै रोजी रात्री उशिरा आणि इतर तीन खेळाडूंना 27 जुलैच्या पहाटे चीनला रवाना व्हायचं होतं. परंतु चिनी अधिकाऱ्यांनी अरुणाचल प्रदेशातील इतर तीन खेळाडूंना स्टेपल्ड व्हिसा जारी केला. मात्र भारत सरकार स्टेपल्ड व्हिसाला मान्यता देत नाही.






अरुणाचल प्रदेशातील तीन खेळाडूंना स्टेपल्ड व्हिसा देण्याच्या चीनच्या निर्णयावर कठोर भूमिका घेत भारताने वुशू संघातील सर्व खेळाडूंना विमानतळावरुन परत बोलावले. जाणून घेऊया स्टेपल व्हिसा? म्हणजे काय आहे, ज्यामुळे भारताने वुशू संघाला माघारी बोलावलं आहे, तो कधी आणि का जारी केला जातो?


स्टेपल्ड व्हिसा म्हणजे काय? 


कोणत्याही नागरिकाला परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिसाची आवश्यकता असते. साधारणपणे, एखादी व्यक्ती परदेशात गेल्यास इमिग्रेशन अधिकारी त्याच्या पासपोर्टवर शिक्का मारतो. ती व्यक्ती त्या देशात का जात आहे हे कळावे म्हणून हा शिक्का मारला जातो. परंतु जर त्याच व्यक्तीला सामान्य व्हिसाच्या ऐवजी स्टेपल्ड व्हिसा जारी केला असेल तर त्याच्या पासपोर्टवर शिक्का मारला जात नाही. त्याऐवजी, व्यक्तीच्या पासपोर्टसह दुसरा कागद स्वतंत्रपणे स्टेपल केला जातो. स्वतंत्रपणे स्टेपल केलेल्या कागदाला स्टेपल्ड व्हिसा म्हणतात.


जेव्हा स्टेपल्ड व्हिसा जारी केला जातो तेव्हा पासपोर्टऐवजी स्वतंत्र कागदावर शिक्का मारला जातो आणि या कागदावर ती व्यक्ती त्या देशात का जात आहे याचा तपशील नोंदवला जातो. स्टेपल व्हिसाधारक आपले काम संपवून परत येतो तेव्हा त्याचा स्टेपल व्हिसा, प्रवेश आणि बाहेर पडण्याची तिकिटे फाडली जातात. म्हणजेच या प्रवासाची कोणतीही नोंद त्याच्या पासपोर्टवर होत नाही. मात्र सामान्य व्हिसाच्या बाबतीत असं घडत नाही.


अरुणाचल प्रदेशातील तीन खेळाडूंना चीनने स्टेपल्ड व्हिसा का दिला? 


कोणताही देश त्याच्या नागरिकत्वाच्या सद्यस्थितीवर आपला निषेध नोंदवण्यासाठी स्टेपल्ड व्हिसा जारी करतो. अरुणाचल प्रदेशातील तीन खेळाडूंना स्टेपल्ड व्हिसा देऊन आम्ही अरुणाचल प्रदेश हा वादग्रस्त प्रदेश मानतो असं चीनला दाखवून द्यायचं आहे. भारताची चीनसोबत 3488 किलोमीटर लांबीची सीमा आहे. परंतु संपूर्ण सीमांकन झालेलं नसल्याने भारत आणि चीनमध्ये अनेक भागावरुन मतभेद आहेत. भारताचा हजारो किलोमीटरचा भूभाग आपला असल्याच दावा चीन करतो. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अरुणाचल प्रदेशातील सुमारे 90 हजार चौरस किलोमीटर भूभागावर चीनने दावा केला आहे.


हेही वाचा


Amit Shah Arunachala Visit: "सुईच्या टोकाएवढंही कोणी अतिक्रमण करु शकत नाही"; अमित शहांनी अरुणाचल प्रदेशवर दावा करणाऱ्या चीनला खडसावलं