Indian Army : सिक्कीम येथे चीन सीमेवर भारतीय लष्कराची ताकद वाढली आहे. सिक्कीम येथे सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांना आता सिग सॉअर असॉल्ट रायफल देण्यात आल्या आहेत. उत्तर सिक्कीममध्ये तैनात असलेल्या सैनिकांना सिग सॉअर असॉल्ट रायफल आणि आधुनिक वाहने पुरवण्यात आली आहेत. याच क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून भारत आणि चीनमध्ये तणावाचं वातावरण आहे. त्यामुळे सैनिकांना या नव्या रायफल पुरवण्यात आल्या आहेत. 


 सैनिकांची क्षमता वाढवणे आणि सैनिकांना सर्व पातळीवर सक्षम करण्यासाठी या अत्याधुनिक रायफल आणि वाहनांचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे. आव्हानात्मक भागात तैनात असलेल्या सैनिकांना आव्हानांचा सामना करताना तो अधिक सोपा व्हावा यासाठी या रायफल देण्यात आल्या आहेत. 






प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LAC) आणि नियंत्रण रेषेपर्यंत (LoC) दहशतवादाने प्रभावित अनेक भागात तैनात असलेल्या सैनिकांना या रायफल पुरवण्यात आल्या आहेत. याबरोबरच उझबेकिस्तानसोबत सुरू असलेल्या 'डस्टलिक' सरावातही या रायफल वापरल्या जात आहेत.







भारतीय लष्कराने गेल्या काही वर्षात अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि आधुनिक उपकरणांचा लष्करात समावेश केला आहे. जास्त उंच  भागात तैनात असलेल्या सैनिकांसाठी ATVs आणि 7.62mm  सिग सॉअर असॉल्ट रायफल पुरवण्यात आल्या आहेत.  उत्तर सिक्कीमच्या मुगुथांग उप-सेक्टरमध्ये 15 हजार 500 फुटांपेक्षा जास्त उंचीवर सैन्य तैनात आहे. एवढ्या उंचीवर भारतीय सैनिक राष्ट्राच्या अखंडतेचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असतात. या भागातच चीनकडून अधिक धोका आहे. त्यामुळे या भागात तैनात असलेल्या सैनिकांना या अत्याधुनिक रायफल देण्यात आल्या आहेत. 


भारताने अमेरिकेकडून या सिग सॉअर असॉल्ट रायफलची खरेदी केली आहे. या आधी जम्मू-काश्मीरमध्ये राबवण्यात येत असलेल्या दहशतवादी विरोधी मोहिमेतील जवानांसाठी अमेरिकेकडून 72 हजार 500 सिग सॉअर असॉल्ट रायफल्सची खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर आता खरेदी करण्यात आलेल्या रायफल चीन सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना देण्यात येणार आहेत. 


महत्वाच्या बातम्या