Punjab Assembly Elections 2022 : पंजाबमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीवरुन राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. दुसरीकडे पंजाबध्ये काँग्रेसमधील अंतर्गत कलह काही मिटायला तयार नाही. कारण, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून काँग्रेसने चरणजीत सिंह चन्नी यांचे नाव पुढे केल्यानंतर नवज्योत सिंह सिद्धू नाराज असल्याचे दिसत आहे. अशातच आता आम आदमी पार्टी मात्र, पंजाबमध्ये जोरदार तयारी करुन मैदानात उतरली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आजपासून आठवडाभर पंजाबमध्ये तळ ठोकणार आहेत. त्यामुळे काँग्रेसमोर पंजाबमध्ये सत्ता वाचवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.


युद्ध जिंकण्यासाठी सैन्याच्या ताकदीपेक्षा त्यांचे धैर्य आणि एकता महत्त्वाची असते. सिद्धू आणि चन्नी यांच्यातील वाद अजूनही सुरूच असेल, तर काँग्रेसला सावध राहण्याची गरज आहे. कारण अरविंद केजरीवाल पूर्ण तयारीनिशी पंजाबच्या निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. गोव्यातील प्रचार संपवून केजरीवाल आज पंजाबमध्ये पोहोचणार आहेत. आठवडाभर ते पंजाबमध्ये तळ ठोकणार आहेत. अरविंद केजरीवाल हे अमृतसर, जालंधर, मोहालीसह अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचारासाठी फिरणार आहेत. केजरीवाल यांची नजर आपले ध्येय पूर्ण करण्याकडे लागली आहे. त्यांचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवारही मेहनत घेत आहेत. तेही सिद्धूंच्याच भागात. भगवंत मान हे आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत. भगवंत मान  यांनी अमृतसर जिल्ह्यातील त्यांच्या चार उमेदवारांच्या समर्थनार्थ रोड शो केला आहे. मान यांनी पंजाबच्या जनतेला अंमली पदार्थांपासून मुक्त करण्याच्या मुद्द्यावर मतदान करण्याचे आवाहन केले आहे.


केजरीवालांचे लक्ष्य पंजाबवर 


आता अरविंद केजरीवाल यांचे संपूर्ण लक्ष पंजाबवर आहे. काल केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनीही दिल्लीहून पंजाबमध्ये पोहोचल्यानंतर भगवंत मान यांचा प्रचार केला होता. सुनीता केजरीवाल या त्यांची मुलगी हर्षिता हिच्यासोबत भगवंत मान यांच्यासाठी धुरी येथे प्रचार केला. आम आदमी पार्टीला या निवडणुकीत सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.


दरम्यान, पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सध्या देशात सुरू आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यातील राजयकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचा पहिला टप्पा 10 फेब्रुलारीला पार पडला होता. त्यानंतर आता पुढच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया 14  फेब्रुलारीला पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. तसेच उत्तराखंड आणि गोव्यामध्ये देखील आज प्रचाराचा शेवटचा दिवस असणार आहे. कारण तिथेही 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.