Chinese Army Kidnaps Teenager : अरुणाचल प्रदेशातील अप्पर सियांग भागातून अपहरण करण्यात आलेल्या 17 वर्षीय भारतीय तरुण मीराम तोरणला सुरक्षित परत करण्याचे आश्वासन चीनने दिले आहे. भारतीय लष्कराने केलेल्या संवादानंतर मीरामच्या सुरक्षित परतीच्या विनंतीवर, चिनी पीएलएने निर्धारित प्रोटोकॉलनुसार तरुणाला भारताकडे परत करण्याचे आश्वासन दिले आहे. लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासाठी सात ते दहा दिवस लागू शकतात. मीरामला भारतीय लष्कराला केव्हा आणि कुठे परत केले जाईल, याबाबतच्या माहितीची चिनी लष्कराकडून प्रतीक्षा केली जात आहे, असेही सांगण्यात आले आहे. 


अरुणाचल प्रदेशचे लोकसभा खासदार तापीर गाओ (Tapir Gao) यांनी गुरुवारी (22 जानेवारी) दावा केला की, चीनी लष्कराने (PLA - People's Liberation Army) राज्यातील भारतीय हद्दीतील अप्पर सियांग जिल्ह्यातून एका 17 वर्षीय तरुणाचे अपहरण केले. मिराम तोरण असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव असल्याचे गाओ यांनी सांगितले. चिनी सैन्याने सेयुंगला भागातील लुंगटा जोर भागातून भारतीय तरुणाचे अपहरण केले आहे. ही घटना 18 जानेवारी रोजी घडली.


चिनी लष्कराकडून दोन तरुणांच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र चीनी लष्कराच्या ताब्यातून दुसरा तरुण पळण्यात यशस्वी झाला आणि त्याने स्थानिक अधिकाऱ्यांना याची माहिती दिली आहे. अपहरणाचा प्रयत्न झालेले दोन्ही तरुण जिदो गावचे रहिवासी आहेत. अरुणाचल प्रदेशात शियांग नदी भारतात प्रवेश करते त्या ठिकाणाजवळ ही घटना घडल्याचे खासदारांनी सांगितले होते. 


खासदार तापीर गाओ यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री निशीथ प्रामणिक यांना चिनी सैन्याने एका मुलाचे अपहरण केल्याची माहिती देत सरकारी यंत्रणांनी या मुलाची लवकर सुटका करण्याची विनंती केली होती.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha