Indian Army recruitment : तुम्हाला जर देशसेवेची आवड असेल आणि भारतीय सैन्य दलात काम करायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही अभियांत्रिकीचे विद्यार्थी असाल तर भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी तुम्हाला मिळणार आहे. भारतीय सैन्याने जानेवारी 2026 पासून तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रम (TGC-142) साठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या अभ्यासक्रमामुळे तुम्हाला कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय थेट SSB मुलाखतीद्वारे इंडियन मिलिटरी अकादमी (IMA), डेहराडून येथे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळते, त्यानंतर तुम्ही कायमस्वरूपी कमिशन मिळवून सैन्याचा भाग बनू शकता.
कोण अर्ज करु शकतो? वयोमर्यादा किती?
या भरतीसाठी फक्त अविवाहित पुरुष उमेदवार पात्र आहेत, जे अभियांत्रिकी पदवीधर आहेत किंवा अंतिम वर्षात शिकत आहेत. या पदांसाठी वयोमर्यादा ही 20 ते 27 वर्षे (ज्यांचा जन्म 2 जानेवारी 1999 ते 1 जानेवारी 2006 दरम्यान झाला आहे) दरम्यान आहे. बी.ई. मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा बी.टेक पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, पदवी अधिसूचनेत नमूद केलेल्या अभियांत्रिकी शाखांमध्येच असावी. बी.ई./बी.टेक किंवा शेवटच्या वर्षात असलेले अविवाहित पुरुष उमेदवार अर्ज करु शकतात.
लेखी परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे निवड
दरम्यान, सैन्यात भरती होण्यासाठी लेखी परीक्षा नाही पण उमेदवारांची निवड थेट एसएसबी मुलाखतीद्वारे केली जाईल. डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध प्रशिक्षण मिळणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कायमस्वरूपी कमिशनसह सैन्य अधिकारी होण्याची संधी मिळणार आहे.
कसा कराल अर्ज?
इच्छुक उमेदवार भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे, त्यामुळे उशीर करू नका. यासाठी नोंदणी प्रक्रिया नुकतीच सुरु झाली आहे. नोंदणीची शेवटची तारीख 29 मे 2025 दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.