नवी दिल्ली : भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये घुसून 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. यामध्ये बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय देखील समाविष्ट होते. ते नष्ट करण्यासाठी भारताने त्याचे सर्वात शक्तिशाली शस्त्र वापरले.

वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेला भारताविरोधात बळ दिलं. त्यामुळेच भारताला त्यावर कडक उपाययोजना करत त्याच्या सर्वात शक्तिशाली शस्त्राचा वापर करावा लागला. पण हे सर्वात शक्तिशाली अस्त्र कोणतं हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. 

संरक्षण मंत्री राजनाथ यांनी रविवारी संवाद साधताना काही संकेत दिले. ते म्हणाले की, "भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी ब्राह्मोसचा वापर केला. ब्राह्मोसचा आवाज रावळपिंडीपर्यंत ऐकू येत होता."

हवाई दलाने काय म्हटले?

भारतीय हवाई दलाने सांगितले की, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दरम्यान नेमून दिलेली कामे अचूकतेने यशस्वीरित्या पार पाडली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी 7 मे रोजी ही कारवाई सुरू करण्यात आली. पाकिस्तानी हल्ल्यांनंतर, सर्व प्रत्युत्तरात्मक कारवाया 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत करण्यात आल्या.

भारतीय हवाई दलाने (IAF) एका निवेदनात म्हटले आहे की, ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. त्याची योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाईल. 

भारत आणि पाकिस्तानने जमीन, हवाई आणि समुद्र या दोन्ही ठिकाणी सर्व गोळीबार आणि लष्करी कारवाया तात्काळ थांबवण्यास सहमती दर्शविली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी शनिवारी घोषणा केली होती की भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (DGMO) शनिवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून जमीन, हवाई आणि समुद्रावरील सर्व गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्यास सहमती दर्शविली आहे.

आम्हाला मध्यस्ताची गरज नाही

पाकव्याप्त काश्मीरबद्दल भारतानं आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केल्याचं सूत्रांकडून कळतंय. पाकिस्ताननं 1948 साली ताबा मिळवलेला काश्मीरचा भाग हा आमचंच आहे आणि तो परत घ्यायचा आहे. यामध्ये आम्हाला कुठल्याही मध्यस्थाची गरज नाही, अशी भूमिका भारत सरकारनं घेतली आहे. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी सोशल मीडियावर भारत-पाकिस्तानमध्ये मध्यस्थी केल्याबद्दल अनेक दावे केले होते. त्या पार्श्वभूमीवर भारताची ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, पाकिस्तानशी अन्य कुठल्याही मुद्द्यावर चर्चा होऊ शकत नाही, पाकिस्तान जर दहशवाद्यांना सोपवण्याबाबत बोलणार असेल तर आम्ही चर्चा करू असं देखील भारतानं स्पष्ट केल्याची माहिती आहे.