Indian Army Disengagement Plan: भारत आणि चीनच्या सैन्याने गोगरा-हॉटस्प्रिंग्स परिसरातून माघार घेण्याचे मान्य केले आहे. दोन्ही सैन्य 12 सप्टेंबरपर्यंत या भागातून पूर्णपणे बाहेर पडतील.
मोदी आणि शी जिनपिंग भेट?
सूत्रांच्या माहितीनुसार, मोदी-पुतिन भेट जवळपास निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले. डिसइंगेजमेंट प्रक्रिया सुरळीतपणे आणि यशस्वीपणे पूर्ण झाल्यास, 15 आणि 16 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समरकंद दौऱ्यासाठी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेसाठी मंच तयार केला जाईल, ज्यामध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग उपस्थित असतील. मोदी आणि शी यांच्यातील भेटीची पुष्टी होणे बाकी आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे (MEA) प्रवक्ते अरिंदम बागची यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, चीन आणि भारत या दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली आहे की, परिसरात बांधलेल्या सर्व तात्पुरत्या संरचना आणि इतर संबंधित पायाभूत सुविधा नष्ट केल्या जातील तसेच या भागाची परस्पर पडताळणी केली जाईल.
प्रत्येक गोष्टीची विशेष काळजी
गोगरा-हॉट स्प्रिंग्स भागातील सैन्य माघारी आले खरे, परंतु याचा संबंध गलवानमधील हिंसक चकमकीशी जोडला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्थानिक लष्कर कमांडर आणि अधिकाऱ्यांना प्रत्येक गोष्टीची विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. सैन्याच्या हालचालींचीही पडताळणी केली जात आहे.
कमांडरना या सूचना दिल्या
संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पाडावी आणि परिसरात तणाव वाढू नये, अशा सूचनाही कमांडरना दिल्या आहेत. जून 2020 मधील गलवान संघर्ष लक्षात घेऊन, या संपूर्ण प्रक्रियेमागील हेतू हा आहे की आता कोणतीही अनुचित घटना घडू नये. मात्र, सैन्य पूर्णपणे माघारी घेण्याबाबत अद्याप चर्चा होणे बाकी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
20 भारतीय जवानांचे देशासाठी बलिदान
भारत आणि चीन आतापर्यंत गलवान प्रदेशापासून वेगळे करण्यात यशस्वी झाले आहेत, जेथे जून 2020 मध्ये दोन्ही बाजूंच्या सैनिकांमध्ये भीषण चकमक झाली होती. या चकमकीत 20 भारतीय जवानांनी देशासाठी बलिदान दिले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 40 हून अधिक चिनी सैनिक मारले गेले किंवा जखमी झाले.
अजित डोभालांकडून सशस्त्र दलांच्या उच्च अधिकाऱ्यांसह देखरेख
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल सशस्त्र दलांच्या उच्च अधिकाऱ्यांसह नवी दिल्लीत या प्रक्रियेवर देखरेख करत आहेत. तर PP 15 मधून माघार घेण्याचा निर्णय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भारत-जपान 2+2 मंत्रीस्तरीय बैठकीसाठी टोकियोला रवाना होण्यापूर्वी घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.