राहुल गांधी जैशच्या म्होरक्याला म्हणाले 'मसूद अजहरजी'
एबीपी माझा वेब टीम | 11 Mar 2019 08:32 PM (IST)
पुलवामा हल्ल्यावरून भारतीय जनता पक्षावर टीका करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोठी चूक केली आहे. भर सभेत राहुल गांधी यांनी पुलवामा हल्ल्यामागचा सुत्रधार जैश-ए-मोहम्मद या दशतवादी संघटनेच्या म्होरक्याचा 'मसूद अजहरजी' असा आदरार्थी उल्लेख केल्याने खळबळ उडाली आहे.
नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यावरून भारतीय जनता पक्षावर टीका करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोठी चूक केली आहे. भर सभेत राहुल गांधी यांनी पुलवामा हल्ल्यामागचा सुत्रधार जैश-ए-मोहम्मद या दशतवादी संघटनेच्या म्होरक्याचा 'मसूद अजहरजी' असा आदरार्थी उल्लेख केल्याने खळबळ उडाली आहे. भाजपला लक्ष्य करण्याच्या नादात राहुल गांधी स्वत:च अडचणीत अडकले आहेत. आज नवी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या बुथ कार्यकर्त्यांसमोर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, 'पूर्वीच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनेच मसूद अझहरला सोडलं होतं'. परंतु त्याचवेळी त्यांनी मसूदचा मसूद अजहरजी असा आदरार्थी उल्लेख केला आहे. संपूर्ण व्हिडीओ पाहा राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे राहुल गांधी यांना लक्ष्य करण्याची मिळालेली संधी भाजपने सोडली नाही. भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. या ट्वीटमध्ये भाजपने म्हटले आहे की, 44 भारतीय जवानांना मारणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याबाबत राहुल गांधी यांच्या मनात आदर आहे.