नवी दिल्ली: काश्मीरमधील अनंतनाग येथे दहशतवाद्यांशी लढा देणारे लष्करी श्वान 'झूम'ची (Army Dog Zoom) मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली असून त्याचा मृत्यू झाला आहे. रविवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचा हा श्वान गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. आज त्याने अखेरचा श्वास घेतला.
लष्करी श्वान झूम गेल्या दोन दिवसांपासून 54 AFVH (Advance Field Veterinary Hospital) या लष्कराच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता. आज दुपारी 12 च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. लष्कराने याबद्दलची माहिती दिली आहे. झूमने आपले कर्तव्य निभावत वीराचा मृत्यू पत्करला. 9 ऑक्टोबर रोजी दहशतवाद्यांशी लढताना झूम जखमी झाला होता. राष्ट्र त्याचे बलिदान नेहमी स्मरणात ठेवेल असं लष्कराने त्याच्या निवेदनात म्हटलं आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचा श्वान गंभीर जखमी झाला होता. या चकमकीदरम्यान लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार झाले, त्यात 'झूम' श्वानला गोळी लागली होती. आज त्याचा मृत्यू झाला. झूमच्या मृत्यूनंतर लष्करातील अनेकांना मोठा धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
लष्करी श्वान 'झूम' हा प्रशिक्षित श्वान आहे. दहशतवाद्यांना शोधून काढणे आणि त्यांचा खात्मा करण्याचे प्रशिक्षण झूमला देण्यात आले आहे. अनंतनाग परिसरात झूमने दहशतवाद्यांना शोधून काढलं आणि त्यांच्यावर हल्ला केला. याचवेळी त्याला गोळी लागली आणि तो जखमी झाला.
सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले तर लष्कराचे दोन जवान जखमी झाले. दहशतवाद्यांकडून दोन AK रायफल जप्त करण्यात आल्या आहेत.
संबंधित बातम्या :