Indian Air Force Day : भारतीय वायू सेना दल हे जगातील सर्वात शक्तीशाली हवाई दलाच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे. भारतीय वायु सेनेच्या ताकदीमुळे आज कोणताही देश भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करत नाही.  अमेरिका, रशिया आणि चीन  पाठोपाठ भारताचे हवाई दल जगात सर्वात मोठे आहे. प्रत्येक भारतीयाला याचा अभिमान आहे. याच हवाई दलाची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 रोजी ब्रिटिशांनी रॉयल भारतीय हवाई दल म्हणून केली होती.  स्वातंत्र्यानंतर त्याची ओळख भारतीय हवाई दल म्हणून झाली.  1932 पासून दरवर्षी 8 ऑक्टोबर हा दिवस ‘भारतीय वायु सेना दिवस’ (Indian Air Force Day) म्हणून साजरा होतो.    


पहिल्या महायुद्धापासून युद्धशास्त्राचे हवाई युद्ध हे एक नवे अंग निर्माण झाले. या युद्धाचा उपयोग जर्मनी,  फ्रान्स, ब्रिटन,रशिया आणि अमेरिका सारख्या राष्ट्रांनी युद्धात करण्यास सुरुवात केली. 1918 ते 38 या एकवीस वर्षांच्या दोन जागतिक युद्धांच्या काळात एकामागून एक लहान-मोठ्या राष्ट्रांनी हवाई दले स्थापण्यास सुरुवात केली.  या काळात ब्रिटिशांनी  ‘रॉयल एअर फोर्स’ची स्थापना केली. त्यात दोन स्क्वॉड्रन्स, 80 अधिकारी आणि 600 सैनिक भारतात ठेवले. 1920 पर्यंत स्क्वॉड्रन्सची संख्या आठपर्यंत गेली आणि  1923-24 मध्ये ती सहापर्यंत खाली आली. त्यांपैकी चार भूसेनेला पाठिंबा देणारी आणि दोन बाँबर स्क्वॉड्रन्स होती. सर ॲण्ड्र्यू स्कीन कमिटीच्या शिफारशीनुसार 1928 मध्ये क्रॅनवेलच्या वैमानिक शाळेत सहा हिंदी सैनिकांनी दरवर्षी प्रशिक्षण घ्यावयाचे, असे ठरले आणि हिंदी हवाई दलाची  8 ऑक्टोबर 1932 रोजी स्थापना झाली.  मात्र हिंदी वैमानिकांची पहिली प्रशिक्षित तुकडी 1933 मध्ये बाहेर पडली.  


12 मार्च  1945 रोजी वायुदलाचे नाव रॉयल इंडियन एअरफोर्स असे झाले. त्यानंतर  भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर या नावातील रॉयल हा शब्द वगळण्यात आला आणि  इंडियन एअरफोर्स असे नाव देण्यात आले.  स्थापनेपासूनच हवाई दलाने अनेक यशस्वी मोहिमा पार पाडल्या आहेत.  भारतातील पहिल्या कर्तव्यक्षेत्राप्रमाणे या चिमुकल्या हिंदी हवाई दलाचे कार्य वायव्य सरहद्द प्रांतातील बंडखोर पठाणांना काबूत ठेवणे हे होते. या दलाला युद्धक्षम बनविण्याचे शिक्षण तेथेच मिळाले. ऑगस्ट 1940  मध्ये दौर खोऱ्यात तीव्र गोळीबाराविरुद्ध हिंदी वैमानिकांनी अकरा हल्ले केले होते. 


सप्टेंबर 1940 मध्ये 24 हिंदी वैमानिकांची एक तुकडी इंग्लंडमध्ये लष्कराच्या मदतीसाठी रवाना झाली. तेथे त्यांना लढाऊ क्रमांक 7 विमानोड्डाणाचे उच्च शिक्षण दिल्यानंतर युद्धात भाग घेता आला. तीव्र हवाई लढायांमध्ये त्यांनी नाव गाजविले. जुलै 1942 पर्यंत आठ जणांनी युद्धकार्यात आपले प्राण दिले.  यानंतर आणखी काही तुकड्या शिक्षणासाठी इंग्लंड आणि कॅनडा येथे पाठविण्यात आल्या. यांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी देखील हिंदी अधिकारी इंग्लंडमध्ये पाठविण्यास सुरुवात झाली होती. 1945 पर्यंत 37 अधिकाऱ्यांनी हे प्रशिक्षण घेतले.


हिंदी वैमानिकांनी म्हणजेच भारतीय वैमानिकांनी दुसऱ्या महायुद्धातील सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे ब्रह्मदेशातील ( म्यानमार) जपानी सेनेविरुद्धचे हल्ले होत त्यावेळी केली.  हिंदी वैमानिकांचे स्क्वॉड्रन एक हे त्या वेळी कुंगू गावी होते. त्यांच्याजवळ ‘लिसँडर’ नावाचे टेहळणी करण्याच्या क्षमतेचे जपान्यांच्या विमानांपेक्षा धिम्या गतीचे विमान होते. परंतु,  स्क्वॉड्रन कमांडरने त्यात थोडेफार फेरबदल करून त्याला युद्धक्षम बनविले आणि जपानी हवाई अड्ड्यावर यशस्वी बाँबहल्ले केले. जपानी सैन्याने जेव्हा फार मोठे हल्ले करून ब्रह्मदेश पादाक्रांत केला  त्या वेळी माघार घेणाऱ्या भूसेनेला हिंदी वैमानिकांनी मोलाची मदत केली. या कार्यामुळे पहिल्या स्क्वॉड्रनची या खूपच वाहवा झाली. लढाई संपेपर्यंत त्यांनी तब्बल 4,813 विमानी हल्ले केले.  या आघाडीवर हिंदी वैमानिकांनी फार महत्त्वाचे कार्य केले आणि बहादुरी गाजविली. नोव्हेंबर 1943-44 दरम्यान आराकानवरील दुसऱ्या मोहिमेत हिंदी हवाई दलाच्या सहाव्या व आठव्या स्क्वॉड्रन्सनी मिळून चारशेवर हल्ले करून जानेवारीत सातशे तासांपेक्षा अधिक विमानांची उड्डाणे केली आणि मित्र राष्ट्रांना सर्वतोपरी मदत करून आराकानमधून जपानी लष्कराला हाकलून देण्यास मदत केली. 
 
भारतीय हवाई दलाने 1960 मध्ये पहिला सर्वात मोठा संघर्ष केला. जेव्हा बेल्जियमची काँगोवरील 75 वर्षांची सत्ता अचानक संपुष्टात आली आणि देशात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि बंडखोरांच्या कारवाया सुरू झाल्या.  संयुक्त राष्ट्रांच्या काँगो मोहिमेला मदत करण्याच्या उद्देशाने भारतीय हवाई दलातील एक पथक पाठवण्यात आले. स्क्वॉड्रनने नोव्हेंबरमध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात केली. कॅनबेरा, लिओपोल्डविले आणि कमिना येथील बंडखोरांचा पाडाव करत संयुक्त राष्ट्रांच्या ग्राउंड तुकडीसाठी एकमेव हवाई तळ बनले. हे भारतीय हवाई दलाचे मोठे यश होते. 


1962 मध्ये भारत आणि चीन यांच्यातील परिस्थिती युद्धपातळीवर पोहोचली जेव्हा चीनने आपले सैन्य भारताच्या सीमावर्ती भागात हलवले. चीनच्या हातून अनेक ठिकाणी विशेषत: जम्मू-काश्मीरमध्ये अडचणींचा सामना करावा लागला. 1965 मध्ये भारत-चीन युद्धानंतर तीन वर्षांनी काश्मीरवरून भारत-पाकिस्तान युद्ध झाले. चीनकडून झालेल्या पराभवातून धडा घेत भारताने यावेळी युद्धकाळात आपल्या हवाई दलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. भारतीय हवाई दलाने शत्रूच्या हवाई दलाशी आमने-सामने सामना करण्याची ही पहिलीच वेळ होती.  1965 च्या युद्धानंतर भारतीय हवाई दलाने आपल्या क्षमतेमध्ये बदल आणि सुधारणांची मालिका सुरू केली. पॅरा कमांडोची रेजिमेंट 1966 मध्ये उभारण्यात आली. त्याची रसद, पुरवठा आणि बचाव कार्ये वाढवण्यासाठी भारतीय वायुसेनेने हिंदुस्तान एरोनॉटिक्सने एव्ह्रोच्या परवान्याअंतर्गत तयार केलेली 72 एचएस 748 विमाने समाविष्ट केली.  भारताने लढाऊ विमानांच्या स्वदेशी उत्पादनावर अधिक भर देण्यास सुरुवात केली, ज्याचा परिणाम म्हणून प्रख्यात जर्मन एरोस्पेस अभियंता कर्ट टँक यांनी डिझाइन केलेले HF-24 मारुत विमाने भारतीय वायुसेनेचा भाग बनले.  


बांगलादेश मुक्ती युद्ध (1971)
1971 च्या उत्तरार्धात पूर्व पाकिस्तानमधील स्वातंत्र्य चळवळीमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात बांगलादेश मुक्ती युद्ध सुरू झाले.  22 नोव्हेंबर 1971 रोजी युद्ध सुरू होण्याच्या दहा दिवस आधी चार पाकिस्तानी F-86 सेबर लढाऊ विमानांनी भारतीय आणि गरीबपूरला धडक दिली. आंतरराष्ट्रीय सीमेच्या अगदी जवळ असलेल्या मुक्ती भानी भागात त्यांनी हल्ला केला. चारपैकी तीन सेबर विमाने भारतीय ग्नॅट विमानांनी पाडली. 3 डिसेंबर रोजी भारताने औपचारिकपणे पाकिस्तानविरुद्ध युद्ध घोषित केले. त्यानंतर पाकिस्तानी हवाई दलाने श्रीनगर, अंबाला, सिरसा, हलवारा आणि जोधपूर येथे जोरदार हल्ले केले.  पहिल्या दोन आठवड्यात भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत  उड्डाणे केली आणि वाढत्या सैन्याला मदत केली. पश्चिम आघाडीवरील लोंगेवालाच्या लढाईत हवाई दलाने 29 पाकिस्तानी रणगाडे, 40 चिलखती वाहने आणि एक रेल्वे नष्ट केली.  वायुसेनेने पश्चिम पाकिस्तानवर बॉम्बफेक करून अनेक प्रमुख भागांना लक्ष्य केले. यात कराचीतील ग्राउंड इंस्टॉलेशन्स, मंगला धरण आणि सिंधमधील गॅस प्लांट्स यांचा समावेश आहे.  पूर्व पाकिस्तानमध्ये अशीच रणनीती वापरण्यात आली जिथे हवाई दलाने अनेक कारखाने सुरू केले होते.   


ऑपरेशन मेघदूत 
1984 मध्ये भारताने ऑपरेशन मेघदूत सुरू केले, ज्या अंतर्गत सियाचीनला पुन्हा काश्मीरमध्ये समाविष्ट केले जाणार होते. सियाचीनच्या कठीण परिस्थितीमुळे अशा प्रकारची फक्त एक लष्करी कारवाई यशस्वी झाली. भारतीय सैन्याला कोणत्याही अडथळ्यांचा सामना करावा लागला नाही आणि सियाचीनच्या बहुतांश भागात आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध करण्यात ते यशस्वी झाले.


हवाई दल भारताची एक मोठी ताकद 
सध्या भारतीय हवाई दलाची  60 एअरबेस देशभरामध्ये आहेत. एकूण 1 हजार 500 हून अधिक लढाऊ विमाने तसेच हॅलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलाकडे आहेत. यामध्ये 600 लढाऊ विमाने  500  हून अधिक मालवाहू विमानांचा समावेश आहे.  याशिवाय भारतीय हवाई दलाकडे अनेक हॅलिकॉप्टर्सही आहे. ही भारताची एक मोठी ताकद आहे.  सात कमांड्सकडे या सर्व एअरबेसची विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये वेस्टर्न एअर कमांडअंतर्गत सर्वाधिक म्हणजे 16 एअरबेस आहेत तर सर्वात कमी म्हणजे सात एअरबेसचे नियंत्रण सेंट्रल एअर कमांडकडे आहे.  सद्याच्या काळात आधुनिक रडार यंत्रणा, क्षेपणास्त्रे, दळणवळण यंत्रणा, नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर सी-4 आय ही संगणक प्रणाली देखील भारतीय हवाई दलाकडे आहे. हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करणारी विमाने, विमानातून रडार वापरून दूर अंतरावरील शत्रूच्या विमानांची टेहळणी करणारी यंत्रणा, कक्षेबाहेरील शत्रूच्या ठिकाणाचा वेध घेणारी यंत्रणा असणारी विमाने अशी अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्रे आज भारतीय हवाई दलाकडे आहेत.