Partition Horrors Remembrance Day : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. मात्र 75 वर्षांपूर्वी 14 ऑगस्ट याच दिवशी अखंड भारताचे दोन तुकडे झाले. ही वेदना लक्षात घेऊन भारताच्या स्वातंत्र्याच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. आता दरवर्षी 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी म्हणजेच 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी दिन म्हणून स्मरणात ठेवला जाईल. देशाची फाळणी कशी भयावह ठरली आणि त्याचा परिणाम आजही दिसून येतो हे लक्षात ठेवण्यासाठी 14 ऑगस्ट रोजी हा विशेष दिवस साजरा केला जाणार आहे.
तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मध्यरात्री घोषणा केली, देशात एकच जल्लोष झाला. देश स्वतंत्र झाला मात्र पाठीवर असंख्य जखमा घेऊन. अखंड भारताचे दोन तुकडे झाले आणि भारत पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे निर्माण झाली. फाळणीच्या वेदना आजही अनेकांच्या मनात घर करून आहेत. त्याच वेदनांना व्यासपीठ देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा जींच्या सूचनेनुसार 14 ऑगस्ट हा "विभाजन विभीषिका स्मृति दिवस" म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत.
कसा साजरा होणार विभाजन विभीषिका स्मृति दिवस?
- भारत पाकिस्तानच्या फाळणीमुळे लोकांच्या मनात एकमेकांविषयी तिरस्काराची आणि अविश्वासाची भावना निर्माण झाल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या दुःखद घटनेची आठवण म्हणून प्रत्येक जिल्ह्यात दोन कार्यक्रम करावेत.
- दोन कार्यक्रमांमध्ये एक मूक मिरवणूक, यात्रा तर दुसरा सभागृहात आयोजित करावा.
- मिरवणूक,यात्रेत बॅनर, फाळणीच्यावेळी घडलेल्या घटनांशी संबंधित फलक, राष्ट्रध्वज तिरंगा लावला जाणार आहे.
- ज्या लोकांनी फाळणीमध्ये वेदना व दुःख भोगले, ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांच्या स्मरणार्थ मूक मिरवणूक, यात्रा निघेल.
- सभागृहात फाळणीसंबंधी माहिती आणि दुःखद घटनेचे स्मरण करुन देणारे चर्चा सत्राचे आयोजन केले जाणार आहे.
- फाळणीमध्ये ज्या कुटूंबिय किंवा व्यक्तींनी दुःख, वेदना सोसल्या त्यांचा सन्मान केला जाणार आहे
- फाळणी दिनासंबंधी प्रदर्शनी लावून त्यामध्ये वृत्तपत्रामधील तसेच अन्य लेख आणि छायाचित्रे लावणे
- सोशल मीडियाच्या माध्यमातून चलचित्र (वीडियो) बनवून अधिकाधिक प्रचार-प्रसिध्दी केली जाणार आहे
पंतप्रधान मोदी हे नेहमीच वेगवेगळ्या घोषणामुळे चर्चेत राहतात. काशी विश्वनाथ कॉरीडोर असेल किंवा संसदेवर लावलेल्या राजमुद्रेचा कार्यक्रम अगदी आताचा हर घर तिरंगा हा उपक्रम असेल नरेंद्र मोदी कायम टिकेचे धनी झालेत. आता 75 वर्षपूर्वीच्या जखमा उखरून काढण्याचा कार्यक्रमच जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर टीका झाली नाही तरच नवल...