Vaccine on TB : येत्या दोन वर्षात भारतात क्षयरोग विरोधी लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूटने (NARI) दिलेल्या माहितीनुसार, क्लिनिकल चाचणी सुरू असून 2024 पर्यंत लस उपलब्ध होऊ शकते. सध्या भारतातील सहा राज्यामधील 18 ठिकाणी लस चाचणी सुरू आहे. यामध्ये 12 हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला आहे. 


क्षयरोग विरोधी लशीची चाचणी झाल्यानंतर फेब्रुवारी 2024 पर्यंत या चाचणीचा फॉलोअप सुरू राहिल. या चाचणीचे निकाल सकारात्मक राहिल्यास क्षयरोग विरोधी लस उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होईल. लस चाचणीत सहभागी असलेले नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूटचे डॉ. सुचित कांबळे यांनी सांगितले की, लाळेसंबंधी पॉझिटीव्ह पल्मोनरी टीबी रुग्णांकडून निरोगी व्यक्तींमध्ये क्षय रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी VPM 1002 आणि ImmunoVac - या दोन लशींची परिणामकारकता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी चाचण्या सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


भारतातून 2025 पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी नवीन ट्युबरकुलोसिस लशींची आवश्यकता आहे. डॉ. कांबळे यांनी सांगितले की,  VPM 1002 आणि ImmunoVac - या दोन लशींची परिणामकारकता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक आणि ओदिशा राज्यातील 18 शहरांमध्ये ही लस चाचणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 


या लस चाचणीसाठी सहा वर्ष अथवा त्यावरील 12000 लोकांनी नोंदणी पूर्ण करण्यात आली असून 2024 पर्यंत फॉलोअप सुरू असणार आहे. ही लस चाचणी आयसीएमआर-एनएआरआयच्यावतीने सुरू आहे. चाचणीत  असलेल्या 1593 लोकांवर 38 महिने नियमितपणे देखरेख ठेवली आहे. पुण्यात 2024 मध्ये अखेरचा फॉलोअप पूर्ण होण्याची शक्यता आहे. 


डॉ. कांबळे यांनी सांगितले की, चाचणीनंतर समोर आलेल्या आकड्यांच्या विश्लेषणातून वैज्ञानिक निष्कर्षाच्या आधारे आम्ही लशीच्या परिणामकतेबाबत ठोसपणे काही गोष्टी मांडू शकतो. भारतात येत्या दोन वर्षात क्षयरोगावर एक प्रभावी लस असेल अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha