India Weather Update News: देशात सर्वत्र मान्सून (Monsoon) दाखल झाला आहे. त्यामुळं सध्या देशाच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत (Heavy Rain) असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही भागात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान, आजही देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जाणून घेऊयात हवामानाबद्दल सविस्तर माहिती.
दिल्लीत आज जोरदार पावसाचा इशारा
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज दिल्लीत जोरदार पाऊस पडणार आहे. तसेच बिहारमध्येही देखील मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज दिल्लीचे कमाल तापमान 35 अंश आणि किमान तापमान 26 अंश असू शकते. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 16 जुलैपर्यंत उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व उत्तर प्रदेशच्या भागात पावसाचा प्रभाव अधिक दिसून येईल. याशिवाय वीज पडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
देशाच्या 'या' भागात पडणार मुसळधार पाऊस
उत्तराखंडमध्ये आज उत्तरकाशी, चमोली आणि रुद्रप्रयागमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. टिहरी, डेहराडून, पौरी आणि पिथौरागढ भागात पाऊस पडू शकतो. येत्या 72 तासात देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 13 ते 15 जुलै दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, सिक्कीम, बिहारमध्ये पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशमध्ये लोकांना नद्या आणि तलावांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील मुंबईसह ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आज हवामान विभागानं वर्तवली आहे. त्याचबरोबर आज संपूर्ण विदर्भात देखील मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.