India Weather Update : देशाच्या विविध भागात पावसानं जोरदार (Heavy rain) हजेरी लावली आहे. उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरु आहे. सध्या सुरु असलेल्या पावसामुळं नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार देशात सात जुलैपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, येत्या 24 तासांत 12 राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
 
सध्या उत्तर भारतात जोरदार पाऊस सुरु आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश या राज्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. भारतीय हवामान खात्यानं 7 जुलैपर्यंत देशातील विविध भागात विजांच्या गडगडाटासह पाऊस सुरू राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. या दरम्यान कमाल तापमान 36 आणि किमान तापमान 25 राहील, जे सामान्य तापमानापेक्षा कमी आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बिहार, सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


मुसळधार पावसामुळं गुजरातमध्ये 10 जणांचा मृत्यू 


सध्या गुजरातमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक भागात या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. गेल्या 30 तासात मुसळधार पावसामुळं गुजरातमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचलमध्ये गेल्या आठवड्याभरात 24 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीत नाल्यात पडून एका ऑटोचालकाचा मृत्यू झाला. म्हणजेच, या तीन राज्यांमध्ये पावसामुळं 35 मृत्यू झाला आहे. 


बिहारसह  उत्तराखंड राजस्थानमध्ये जोरदार पाऊस


बिहारमध्येही जोरदार पाऊस सुरु आहे. तसेच राजस्थानमध्येही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. राजस्थानमध्ये जून महिन्यात 145.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सामान्यपेक्षा तीन पट पाऊस जास्त झाला आहे. राज्यात साधारणपणे जूनमध्ये केवळ 50.7 मिमी पाऊस पडतो. मात्र, यावर्षी मोठ्या प्रमाणात राजस्थानमध्ये पाऊस पडला आहे. उत्तराखंडमधील चमोली येथे भूस्खलनामुळे बद्रीनाथ महामार्ग (NH 7) बंद करावा लागला आहे. महामार्ग प्राधिकरण ढिगारा साफ करण्यात गुंतला आहे. यापूर्वी 29 जून रोजीही भूस्खलनामुळं बद्रीनाथ महामार्ग 17 तासांसाठी बंद करण्यात आला होता.


मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागात पाऊस


मुंबईसह (Mumbai) राज्यातील काही भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाळा सुरु होऊन एक महिना होऊन गेला तरी पाऊस नसल्यानं शेतकरी (farmers) चिंतेत असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगर, ठाणे, पुणे तसेच कोकणातील जिल्ह्यात पावसानं चांगली हजेरी लावल्याचं चित्र दिसत आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज कोकणात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पश्चिम पुणे जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नारिकांना खबरदारी बाळगण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Rain : मुंबईसह राज्यातील काही भागात पावसाची हजेरी, आज कोकणात पावसाचा यलो अलर्ट