India's first Monkeypox case : मागील काही दिवसांपासून मंकीपॉक्स (Monkeypox) विषाणूचा जगभर धुमाकुळ घातला आहे.  आतापर्यंत 20 हून देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा शिरकाव झाला आहे.  आता केरळच्या कोल्लममध्ये देशातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला आहे. केरळच्या आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी ही माहिती दिली आहे.  


भारतात  केरळच्या कोल्लम येथे  मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला आहे. टीवीएम मेडिकल कॉलेजच्या एक रुग्णामध्ये मंकीपॉक्सची लक्षणे दिसून आली. त्यानंतर चाचण्या केल्या असता मंकीपॉक्स झाल्याचे निष्पन्न झाले. देशात पहिला रुग्ण आढळला तरी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे केरळच्या आरोग्यमंत्री वीना जॉर्ज म्हणाल्या. रुग्णाच्या आई-वडिलांना तिरुअनंतपुरम येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे.


केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या, परदेशातून भारतात परतलेल्या एका व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे दिसून आली त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाला ताप आणि संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर  पुरळ आले आहेत. त्यानंतर रुग्णाचे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे पाठवले. ज्या व्यक्तीमध्ये लक्षणे दिसली तो व्यक्ती यूएईमधील मंकीपॉक्सची लागण झालेल्या एका रुग्णाच्या संपर्कात आला होता.


27 देशात मंकीपॉक्सचे 800 रुग्ण


जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार सध्या 27 देशात मंकीपॉक्सचे आतापर्यंत 800 रुग्ण आढळले आहेत. 


मंकीपॉक्सची लक्षणं काय? 


तज्ज्ञांच्या मते 'मंकीपॉक्स' हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.


कसा वाढतो संसर्गाचा धोका?


संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. तसेच, संक्रमित प्राणी देखील या विषाणूचे सक्रिय वाहक असू शकतात. अशा प्राण्याच्या संपर्कात आल्याने, किंवा विषाणू-दूषित वस्तूंद्वारे देखील ‘मंकीपॉक्स’ पसरू शकतो. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये ‘मंकीपॉक्स’ची सर्वाधिक प्रकरणे आढळतात. मुख्यतः आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे किंवा आयात केलेल्या प्राण्यांमुळे हा विषाणू पसरतो.